बुलढाणा: मध्यरात्रीची वेळ… समृद्धी महामार्गावर वेगाने धावणारी लक्झरी बस… आणि अचानक टायरमधून निघणारा धूर! मृत्यूने गाठण्यापूर्वीच एका देवदूताने वेळीच सावध केले. डोळ्यांदेखत पेटलेल्या बसचा कोळसा होत असताना, सुरक्षित बाहेर पडलेले 36 प्रवासी हात जोडून नियतीचे आभार मानत होते. चालकाने दाखवलेली चपळता आणि प्रसंगावधान यामुळे समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा होणारा भीषण रक्तपात थोडक्यात टळला आहे.
नागपूरहून नाशिकच्या दिशेने प्रवाशांना घेऊन निघालेली खुराणा ट्रॅव्हल्सची बस (क्र. MH-40-CT-8043) मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास मेहकर तालुक्यातील शिवणी पिसा शिवारात पोहोचली होती. किर्र अंधार आणि सर्व प्रवासी साखरझोपेत असताना, चालक वाहिद शेख यांच्या लक्षात आले की चाकाकडील बाजूने धूर येत आहे. विलंब न लावता त्यांनी गाडी थांबवली आणि 'गाडीतून लवकर खाली उतरा' असा ओरडा दिला. प्रवाशांना काही समजायच्या आतच बसने रौद्र रूप धारण केले.
1 जुलै 2023 रोजी समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 25 प्रवाशांचा कोळसा झाला होता. तो काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग पुन्हा घडतो की काय, अशी भीती या घटनेने निर्माण केली होती. मात्र, वायरिंगमधील शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने दाखविलेल्या समयसूचकतेमुळे 36 प्रवाशांचे प्राण सुखरूप वाचले. काही मिनिटांतच बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला होता, हे पाहून प्रवाशांच्या पायाखालची जमीन सरकली.
घटनेची माहिती मिळताच मलकापूर पांग्रा पोलिस आणि एमएसएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. छत्रपती संभाजीनगर येथील कंट्रोल रूमकडून मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आगीने संपूर्ण बस कचाट्यात घेतली होती. भीषण थंडीत प्रवाशांना काही वेळ रस्त्याच्या कडेला बसावे लागले, तरीही जीव वाचल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
"जर चालकाने वेळीच लक्ष दिले नसते, तर आम्ही आज जिवंत नसतो," अशा भावना प्रवाशांनी व्यक्त केल्या. 36 वर्षांचे चालक वाहिद शेख यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. प्रवाशांच्या सुटकेनंतर अकोल्याहून दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आणि त्यांना सुरक्षितपणे नियोजित स्थळी रवाना करण्यात आले. प्रवाशांसाठी वाहिद शेख हे केवळ चालक नसून साक्षात 'देवदूत' ठरले आहेत.