Thursday, June 11, 2026 09:38:28 PM

Ahilyanagar Crime: आणखी एका भोंदूचा पर्दाफाश; मंत्रोच्चाराने आजार बरा करण्याचा दावा, संगमनेर हादरलं

संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथे असलेल्या दत्तधाम आश्रम मंदिरातून ही सर्व भोंदूगिरी चालवली जात होती.

ahilyanagar crime आणखी एका भोंदूचा पर्दाफाश मंत्रोच्चाराने आजार बरा करण्याचा दावा संगमनेर हादरलं

Sangamner Fraud Mentor Rajendra Gadge Arrested : नाशिकच्या भोंदू खरात प्रकरणानंतर अशाच प्रकारची आणखी अनेक प्रकरणे समोर येत आहेत. आता अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात भोंदूगिरी करणाऱ्या राजेंद्र गडगे याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. 'दत्तधाम सरकार' या नावाने दरबार भरवून हा भोंदू केवळ मंत्रोच्चाराने कॅन्सरसारखे दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करत असे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे व्हिडिओ प्रसारित झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर, जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

व्हीआयपी दर्शनासाठी लाखांचे दर आणि लाखो रुपयांची लूट
राजेंद्र गडगे याने श्रद्धेच्या नावाखाली लोकांची लूट करण्याचा मोठा गोरखधंदा मांडला होता. या भोंदूच्या दरबारात नाव नोंदवण्यासाठी 11,000, 21,000 ते 51,000 रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात होते. इतकेच नाही तर व्हीआयपी (VIP) दर्शनासाठी तब्बल 101,000 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला होता. अपत्य नसलेल्यांना अपत्यप्राप्ती करून देणे आणि दैवी शक्तीने आजार बरे करण्याचे आश्वासन देऊन त्याने लाखो रुपये उकळले आहेत. केवळ मंत्रोच्चारच नव्हे, तर तो काही अनधिकृत औषधेही देत असे, ज्याचा अनेकांना त्रास झाल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा - Mumbai Illegal Schools: मुंबईत धक्कादायक प्रकार; 164 शाळा अनधिकृत, हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला

अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धाडसी तक्रार
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (ANiS) राज्य सचिव रंजना गवांदे यांनी या संदर्भात फिर्याद दाखल केली होती. भोंदू राजेंद्र गडगेसह त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सूरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रात्री उशिरा तक्रार प्राप्त होताच संगमनेर पोलिसांनी तातडीने हालचाली करत आरोपी राजेंद्र गडगेला ताब्यात घेतले. गुन्हा दाखल झाल्याच्या 24 तासांच्या आत पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली असून इतर सहकाऱ्यांचा शोध सुरू आहे.

वडगाव पाणी येथील आश्रमात सुरू होती भोंदूगिरी
संगमनेर तालुक्यातील वडगाव पाणी येथे असलेल्या दत्तधाम आश्रम मंदिरातून ही सर्व भोंदूगिरी चालवली जात होती. कॅन्सरसारखे आजार क्षणात संपवण्याचे दावे करून हा भोंदू लोकांची फसवणूक करत होता. सोशल मीडियावरील त्याचे दावे आणि तक्रारींच्या आधारे पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रशासनाने नागरिकांना अशा भोंदूबाबांच्या आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले असून, कायद्याचा बडगा आता अधिक तीव्र झाला आहे.

हेही वाचा - Sahar Shaikh: बेपत्ता युनूस शेख पोलिसांसमोर हजर, नोंदवला जबाब; MIM नगरसेविका सहर शेख अद्याप बेपत्ताच


सम्बन्धित सामग्री