‘मर्जीतील उमेदवारांना पास केलं जातंय…’; MPSC परीक्षांमधील गोंधळावरून महायुतीच्या आमदाराचा खळबळजनक दावा

एमपीएससी परीक्षांमधील विविध त्रुटी आणि गोंधळाबाबत त्रस्त विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले होते.
‘मर्जीतील उमेदवारांना पास केलं जातंय…’;  MPSC परीक्षांमधील गोंधळावरून महायुतीच्या आमदाराचा खळबळजनक दावा
MPSC

MPSC Exam Scam: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) विविध परीक्षांच्या पारदर्शकतेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधकांबरोबरच आता सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनीही प्रशासकीय कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांनी एमपीएससीच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल करत, संपूर्ण आयोगच तत्काळ बरखास्त करावा, अशी थेट मागणी केली आहे. याप्रकरणी आपल्याकडे भक्कम पुरावे आणि काही संशयास्पद पत्रे उपलब्ध असून, ती आपण लवकरच थेट मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करून सखोल तपासाची विनंती करणार असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

4 अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

पत्रकार परिषदेत बोलताना आमदार गायकवाड यांनी दावा केला की, २०१८ पासून आयोगामार्फत राबवण्यात आलेल्या विविध भरती प्रक्रियांमध्ये आणि विशेषतः फॉरेन्सिक विभागाच्या नुकत्याच झालेल्या परीक्षेत मोठे घोळ झाले आहेत. गुणवंत व अभ्यासू विद्यार्थ्यांना बाजूला सारून मर्जीतील उमेदवारांना आर्थिक गैरव्यवहाराच्या माध्यमातून पास केले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. या प्रकरणात देवानंद शिंदे, शैलेंद्र देवळाणकर, सतीश देशपांडे आणि अभय वाघ या चार अधिकाऱ्यांच्या अचानक वाढलेल्या अथांग संपत्तीची अंमलबजावणी संचालनालय (ED) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत (ACB) कसून चौकशी झाली पाहिजे, असे ते म्हणाले.

हेही वाचा – मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ; ‘या’ राज्यातील सरकारकडून 20 वर्षे जुन्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश

शरद पवारांच्या भेटीनंतर सत्ताधारी गोटात हालचाली

एमपीएससी परीक्षांमधील विविध त्रुटी आणि गोंधळाबाबत त्रस्त विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले होते. विरोधी पक्षांनी हा मुद्दा हाती घेतल्यानंतर लगेचच सत्ताधारी आमदाराने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे राज्य शासनाची अडचण वाढण्याची शक्यता आहे. कोणत्याही पक्षाचे सरकार असो, परीक्षांमधील घोटाळे सहन केले जाणार नाहीत असा इशारा दिल्याने आगामी काळात एमपीएससीच्या पुनर्रचनेवरून मोठी राजकीय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version