मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी आपल्या स्पष्ट भाषेत म्हटले की, 'फडणवीसांना वाटतं की ते सगळ्यांना नाचवू शकतात,' अशा शब्दांत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
फडणवीसांवर टीका करताना संजय राऊत म्हणाले की, 'बिल्डर लॉबी कितीही मोठी असली तरी तिची तुलना ठाकरे ब्रँडशी होऊ शकत नाही. 100% मुंबई आणि महाराष्ट्र ठाकरे ब्रँड आहे. तो ब्रँड अपराजित आहे, अजिंक्य आहे. ही केवळ एक राजकीय भावना नसून जनतेच्या मनात खोलवर रुजलेली श्रद्धा आहे.'
हेही वाचा: 'भाजपाने सत्तेच्या हव्यासापोटी...; इम्तियाज जलील यांची भाजपावर घणाघाती टीका
राऊत यांनी भाजपवर थेट टीका करताना असेही म्हटले की, 'बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी जो संघर्ष केला आहे, त्याची तुलना कोणत्याही बिल्डर लॉबी किंवा भाजपच्या स्टाईलशी होऊ शकत नाही. आजही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार लोकांच्या मनात जिवंत आहेत.'
त्यांनी स्पष्टपणे म्हटले की, 'मोदी, शहा किंवा फडणवीस यांच्या कोणत्याही रणनीतीचा सामना ठाकरे ब्रँड करू शकतो. कारण हा ब्रँड कोणत्या जाहिरातींनी किंवा प्रचाराने निर्माण झालेला नाही. हा महाराष्ट्राच्या हृदयातून आलेला आवाज आहे.'
आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, 'तुम्ही विधानसभा निवडणूक काही लबाड्यांमधून जिंकली असेल, पण महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही तयारी करत आहोत. यावेळी जनता खूप जागरूक आणि सावध आहे. त्यामुळे भाजपसाठी परिस्थिती सोपी राहणार नाही.'
हेही वाचा: पैठण-पंढरपूर पालखी मार्गाची दुरवस्था; वारकऱ्यांची मोठी गैरसोय
संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात तापमान वाढले आहे. ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. विशेषतः ठाकरे ब्रँड विरुद्ध बिल्डर लॉबी हा मुद्दा चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.
भाजपकडून यावर काय प्रत्युत्तर दिलं जाईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. पण संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.