Sunday, June 15, 2025 12:58:49 PM

'सत्तेत राहून लोकांची सेवा न करता लूटमारच केली'; राऊतांचा पवारांवर आरोप

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही गटांनी कार्यक्रम घेतले. यावर संजय राऊतांनी अजित पवारांवर टीका करत लूटमार, आंदोलनांचा अपमान आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप केला.

सत्तेत राहून लोकांची सेवा न करता लूटमारच केली राऊतांचा पवारांवर आरोप

Sanjay Raut Slams Ajit Pawar:  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) वर्धापन दिनाच्या निमित्ताने शरद पवार गट आणि अजित पवार गट या दोन स्वतंत्र गटांनी आपापले राजकीय कार्यक्रम घेतले. मात्र, याच पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'सत्तेत राहून लोकांची सेवा न करता लूटमार केली गेली आहे. अजित पवार यांच्याइतका दुसरा कोणी यावर भाष्य करू शकणार नाही,' असे रोखठोक मत राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत म्हणाले की, 'शरद पवारांनी उभारलेला पक्ष हा केवळ निवडणुकीतून नव्हे तर आंदोलनातून उभा राहिलेला पक्ष आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात, जनतेच्या हक्कांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये या पक्षाचा मोलाचा वाटा आहे. शिवसेनेसारखा हा पक्ष आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आंदोलनामुळेच आज अनेक नेते, मंत्री झाले आहेत. त्यातच अजित पवार यांचाही समावेश आहे. त्यामुळे आंदोलनाचा अपमान अजिबात करू नका.'

ते पुढे म्हणाले की, 'सत्तेत राहून लोकांची कामं करायची असतात, पण आजची सत्ता ही तिजोरी लुटण्याचं साधन झाली आहे. हे मी नाही सांगत, तर हे खुद्द अजित पवार सांगत आहेत. गेल्या दहा वर्षांत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहयोग्यांनी सर्वच क्षेत्रात लूट केली आहे. एकही विभाग उरलेला नाही, जिथे भ्रष्टाचार झाला नाही.'

अजित पवारांच्या भूमिकेबाबत बोलताना राऊत म्हणाले की, 'अजित दादांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जी भूमिका मांडली, ती विरोधी पक्षाच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी होती. जर विरोधकांनी आंदोलनच केलं नाही, तर सत्ता माजेल, आणि मग ती सत्ता महानगरपालिका, जिल्हा परिषद यांनाही लुटेल. जनतेच्या प्रश्नांना वाचा कोण फोडणार?'

पुढे बोलताना त्यांनी असा आरोप केला की, 'सत्तेच्या माध्यमातून कोणी जर जनतेची सेवा करत असल्याचा दावा करत असेल, तर तो केवळ ढोंग आहे. वास्तविकता ही आहे की, सत्तेत राहून स्वतःच्या कातडीला वाचवण्यासाठीच अनेक नेते सत्तेच्या जवळ गेले आहेत. अजित पवार यांच्यावर चौकशा सुरू झाल्यानंतर त्यांचा सत्तेतील प्रवेश झाला, ही बाब कुणालाही दडपून ठेवता येणार नाही.' संजय राऊतांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.


सम्बन्धित सामग्री