Saturday, June 14, 2025 04:40:51 AM

मुंबई वाचवायची असेल तर ठाकरे बंधू एकत्र येतील; राऊतांचा स्फोटक दावा

संजय राऊत यांनी मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. मुंबई निवडणुकीत शिंदे-भाजप गटावर पैशांचा वापर व धमकी दिल्याचा आरोप करत मराठी मतदारांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

मुंबई वाचवायची असेल तर ठाकरे बंधू एकत्र येतील राऊतांचा स्फोटक दावा

मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी अलीकडेच दिलेल्या एका निवेदनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत (मनसे) युतीबाबत सकारात्मक भूमिका असल्याचं स्पष्ट केलं आहे. 'उद्धव ठाकरे यांचीही मनसे आणि दिलसे भूमिका आहे,' असं सांगत संजय राऊत यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मराठी मतदारांना एकत्र येण्याचं आवाहन केलं आहे.

राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. 'ही निवडणूक लोकशाहीसाठी महत्त्वाची आहे, मात्र भाजप आणि शिंदे गट यांना धमक्यांच्या आधारे सत्ता मिळवायची आहे,' असा आरोप त्यांनी केला. त्यांनी पुढे सांगितलं की, 'मुंबईची निवडणूक जिंकण्यासाठी पैशांचा वापर, धमक्या, आणि पक्ष तोडण्याचं राजकारण सुरू आहे.' शिंदे गटाच्या प्रचारात 'रोकडा' खुलेआम वाटला जातो, असे गंभीर आरोप त्यांनी यावेळी मांडले.

हेही वाचा: 'आम्ही हस्तक्षेप केला असता पण...' वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात चाकणकरांचा दावा

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अलीकडेच दिलेल्या मुलाखतीमुळे युतीच्या चर्चेला उधाण आले असलं, तरी राऊत यांनी स्पष्ट केलं की, 'एक मुलाखत म्हणजे युती ठरली, असं समजणं चुकीचं आहे. युतीसाठी सखोल चर्चा आणि जनतेचा दबाव ही दोन्ही कारणं महत्त्वाची आहेत.'

'मराठी माणसाला जर मुंबई वाचवायची असेल, तर सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल. ईस्ट इंडिया कंपनीसारखं सरकार सध्या आपली लोकशाही गिळंकृत करत आहे. गुजरातहून आलेले लोक आता मुंबईवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. हे थांबवायचं असेल, तर ठाकरे आणि राज एकत्र आले पाहिजेत,' असं भावनिक आवाहनही त्यांनी केलं.

'उद्धव ठाकरे यांचा मन विशाल आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की, मनसेसोबत सकारात्मक पाऊल टाकायला हरकत नाही. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेना स्थापन केली होती आणि त्याच विचारांची परंपरा आम्ही पुढे नेत आहोत,' असंही राऊत म्हणाले.

शेवटी त्यांनी असेही सांगितले की, 'ईस्ट इंडिया कंपनीच्या मालकांना (मोदी, शहा आणि फडणवीस) संपवण्यासाठी त्यांनी ब्रँड ठाकरे आणि पवार यांना संपवण्याचा प्रयत्न केला. पण जनता आजही या ब्रँड्सच्या मागे उभी आहे. एक निवडणूक जाऊ द्या, सत्ताधारी चेहरे तुम्हाला संपलेले दिसतील.'

या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे. ठाकरे-राज एकत्र आले, तर मराठी मतांची मोठी ताकद एका दिशेने वाहू शकते.


सम्बन्धित सामग्री