सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. हातावरच सुसाईड नोट लिहून जीवन संपवण्याचा निर्णय घेतलेल्या या तरुण डॉक्टरने मागे अनेक गंभीर प्रश्न सोडले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मुंडे या गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होत्या. पोलिस आणि आरोग्य विभागातील वाद, सततची चौकशी आणि वरिष्ठांकडून दुर्लक्ष, यामुळे त्यांच्यावर ताण वाढत गेला. अखेर, या तणावाला कंटाळून त्यांनी काल रात्री आत्महत्या केली.
सुसाईड नोटमध्ये धक्कादायक उघड
घटनास्थळी मिळालेल्या सुसाईड नोटने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. हातावरच लिहिलेल्या या नोटमध्ये डॉ. मुंडे यांनी PSI गोपाल बदने यांनी चार वेळा शारीरिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच, पोलिस कर्मचारी प्रशांत बनकर यांनी सतत मानसिक छळ दिल्याचंही त्यांनी नमूद केलं आहे.
या खुलाशांमुळे पोलिस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.
‘मी आत्महत्या करीन’ वरिष्ठांना दिली होती तक्रार
डॉ. मुंडे यांनी आत्महत्येपूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दिली होती. “माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन,” असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे गंभीरतेने पाहण्यात आले नाही. परिणामी, त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं.
वैद्यकीय क्षेत्रात संताप आणि शोककळा
या घटनेनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात आणि वैद्यकीय समुदायात प्रचंड संताप आहे. डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी वर्गाने या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
महिला डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत आणि कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळप्रकरणांविरोधात ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
सध्या पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपींवर कोणती कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.