Monday, March 09, 2026 01:57:19 AM

SBI Defrauded Case: सरकारी नोकरीचा बनाव करून SBI ला लावला 7 कोटींचा चुना; धक्कादायक प्रकार उघडकीस

RPF कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.

sbi defrauded case सरकारी नोकरीचा बनाव करून sbi ला लावला 7 कोटींचा चुना धक्कादायक प्रकार उघडकीस

नवी मुंबई: देशातील नवरत्न आणि महारत्न कंपन्यांचे अधिकारी असल्याचे भासवून, बनावट कागदपत्रांच्या आधारे स्टेट बँक ऑफ इंडियाला (State Bank of India, SBI) तब्बल 6 कोटी 90 लाखांचा चुना लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईत उघडकीस आला आहे. सीबीडी बेलापूर येथील शाखेत झालेल्या या घोटाळ्याने बँकिंग क्षेत्रातील सुरक्षा आणि कागदपत्र पडताळणीच्या प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयला हा मोठा हादरा बसला असून, या प्रकरणी 51 बोगस कर्जखाती उघडून हा गैरव्यवहार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण कटाचा मुख्य सूत्रधार सुरक्षायंत्रणेशी संबंधित असलेला कर्मचारीच निघाला आहे.

विश्वासाचा गैरफायदा आणि कटाची रचना

या महाघोटाळ्यामागे येमनाथ नाईक राठोड, सद्दाम अली शेख आणि राजू नायके या तिघांचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. यातील येमनाथ राठोड हा केंद्रीय राखीव पोलीस दलात (CRPF) कार्यरत आहे. त्याच्या पदाचा फायदा घेत, तो अनेकदा सीआरपीएफ जवानांच्या वैयक्तिक कर्जाच्या फाईल्स बँकेत मंजुरीसाठी घेऊन येत असे. वारंवार येण्या-जाण्यामुळे त्याने बँक अधिकाऱ्यांचा चांगलाच विश्वास संपादन केला होता.

नेमक्या याच विश्वासाचा त्याने गैरफायदा घेतला. ऑक्टोबर 2023 ते जानेवारी 2024 या अवघ्या चार महिन्यांच्या कालावधीत त्याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने 51 बनावट व्यक्तींच्या नावे फाईल्स तयार केल्या आणि बँकेकडून तब्बल 6 कोटी 90 लाखांचे वैयक्तिक कर्ज मंजूर करून घेतले.

हेही वाचा: Share Market Today: शेअर बाजार आज जोमात; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये मोठी तेजी

महारत्न कंपन्यांच्या नावाचा गैरवापर

बँकेला कोणताही संशय येऊ नये म्हणून या ठगांनी अत्यंत शक्कल लढवली होती. त्यांनी गेल, भेल, सेल, ओएनजीसी, आयओसीएल, हिंदुस्तान एरोनॉटिक्स, बीएसएनएल आणि एनएचएआय यांसारख्या देशातील अग्रगण्य आणि प्रतिष्ठेच्या सरकारी संस्थांची नावे वापरली. या कंपन्यांची हुबेहूब दिसणारी बनावट ओळखपत्रे आणि वेतन प्रमाणपत्रे (Salary Slips) तयार करून ती बँकेत सादर करण्यात आली.

असा फुटला भांडाफोड

गुन्हेगारांची कार्यपद्धती अत्यंत चलाख होती. कर्ज मंजूर झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने त्यांनी नियमित हप्ते (EMI) भरले, जेणेकरून बँकेला त्यांच्याबद्दल कोणतीही शंका येणार नाही. मात्र, काही काळानंतर या 51 खात्यांवर पगार जमा होणे अचानक बंद झाले आणि कर्जाचे हप्ते थकू लागले.

एकाच वेळी देशातील इतक्या नामांकित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे हप्ते कसे काय थकू शकतात, हा प्रश्न बँक अधिकाऱ्यांना पडला आणि त्यांच्यातील संशय बळावला. सत्यस्थिती जाणून घेण्यासाठी बँकेने थेट संबंधित कंपन्यांच्या मुंबई आणि हैदराबाद येथील मुख्य कार्यालयांशी संपर्क साधला. जेव्हा या कार्यालयांनी "असा कोणताही कर्मचारी आमच्याकडे कार्यरत नाही," असे स्पष्ट केले, तेव्हा बँकेच्या पायाखालची जमीनच सरकली.

पुढील तपास सुरू

सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, यामागे आणखी काही मोठी साखळी आहे का, याचा शोध घेतला जात आहे. एका सुरक्षारक्षकानेच बँक अधिकाऱ्यांचा डोळ्यात धूळफेक केल्याने, कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेत 'केवायसी' (KYC) आणि कागदपत्रांची दुहेरी पडताळणी किती महत्त्वाची आहे, हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.

हेही वाचा: Rashmika-Vijay Wedding : ठरलं तर मग! अखेर रश्मिका आणि विजयने अधिकृतपणे दिली नात्याची कबुली; पोस्ट करत म्हणाले; 'आम्ही आमच्या नात्याची नवी सुरुवात...'


सम्बन्धित सामग्री