Wednesday, May 14, 2025 11:50:31 PM

राज्यातील शाळांना किती दिवसांची सुटी, शाळा कधी सुरू होणार? शिक्षण विभागाने दिली माहिती

राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शाळा सुरू होण्याच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत.

राज्यातील शाळांना किती दिवसांची सुटी शाळा कधी सुरू होणार शिक्षण विभागाने दिली माहिती

मुंबई: राज्यातील नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी शाळा सुरू होण्याच्या तारखा ठरवण्यात आल्या असून, उष्णतेच्या तीव्रतेचा विचार करून शिक्षण विभागाने विदर्भातील शाळांना विशेष सवलत दिली आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शाळा 16 जूनपासून नेहमीप्रमाणे सुरू होतील, मात्र विदर्भातील शाळा काहीसा विलंबाने, म्हणजे २३ जूनपासून विद्यार्थ्यांसाठी खुले होतील. विदर्भात उन्हाळ्याच्या जास्त उष्णतेचा विचार करत, शाळा सकाळी 7 ते 11.45 या वेळेत मर्यादित तासांमध्ये सुरू ठेवण्यात येणार आहेत.

राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भात अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करत निर्णय जाहीर केला आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालकांनी संयुक्तरित्या ही माहिती दिली. यंदा संकलित मूल्यमापन चाचणीमुळे शाळा 25 एप्रिलपर्यंत सुरू होत्या, तर निकाल 1 मे रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याबाबतचे निर्णय अधिक सुस्थितीत आणि समन्वय साधून घेतले जात आहेत. शैक्षणिक समन्वयासाठी उर्वरित महाराष्ट्रात 16 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दुसरीकडे, विदर्भातील वाढत्या उष्णतेचा विचार करता या भागातील शाळा 23 जूनपासून सुरू करण्यात येणार असून, सुरुवातीचा आठवडा केवळ सकाळच्या सत्रात घेण्यात येईल. 30 जूनपासून शाळा नियमित वेळापत्रकानुसार चालू होतील. या काळात खासगी किंवा अन्य शिक्षण मंडळांच्या शाळांनी त्यांच्या गरजेनुसार सुटीचे नियोजन करावे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. 


सम्बन्धित सामग्री