रायगडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. महाबळेश्वर पोलादपुर दरम्यान आंबेनळी घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. रायगडच्या आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ जिप खोल दरीत कोसळली आहे. ही स्कॉर्पिओ जिप तब्बल 500 ते 700 फुट खोल दरीत कोसळली असून गाडी आणि इतर मृतदेहांचा शोध सुरु आहे. या शोधकार्या दरम्यान दोन मृतदेह सापडले. तर या दुर्घटनेत स्कॉर्पिओ जिपमधील आठ प्रवाशांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. यावेळी दोन मृतदेह शोधण्याकामी बचाव आणि शोध पथकला यश मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये महेश अनिल पवार (वय 25), आदित्य अशोक साळुंखे (वय 21), रितेश राजेंद्र लोखंडे (वय 25), सुहास जितेंद्र लोखंडे (वय 20), अंश समीर चव्हाण (वय 18), उत्कर्ष आनंद शिंगटे (वय 21), अनिल अभिमन्यू शिंगटे (वय 25) आणि नितीन किसन नायकोंडे (वय 35) यांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.
यावेळी स्कॉर्पिओ जिपमधील सर्वजण कोकण किंवा महाबळेश्वर परिसरात फिरण्यासाठी आले असावेत, असा अंदाज वर्तवला जात आहे. दरी अत्यंत खोल असल्याने गाडी आणि उर्वरित प्रवाशांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान सदर स्कॉर्पिओ जिल्हा सातारा तालुका कोरेगाव आसगाव येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री 10 वाजल्यापासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू असून पोलीस आणि प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, दुर्घटनेचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अशीच एक घटना 2018 मध्ये कृषी विद्यापिठ बससोबत दुर्घटना घडली होती. त्या दुर्घटनेत 30 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. त्याच परिसरातील दरीत आता स्कॉर्पिओ जिप कोसळली आहे.