Bacchu Kadu: महाराष्ट्राच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे बंधू अभिजित तायडे यांची ‘अपघाताचा बनाव’ करून त्यांना संपवण्याचा करण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
अचलपूरचे भाजप आमदार प्रवीण तायडे यांचे सख्खे बंधू अभिजित दिवाकरराव तायडे (वय 40) यांनी याप्रकरणी अमरावती ग्रामीण पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, बच्चू कडू आणि त्यांचे निकटवर्तीय शुभम उर्फ गोलू माहोरे यांनी मिळून अभिजित यांच्या हत्येचा कट आखला होता. हा घातपात नसून केवळ एक ‘अपघात’ आहे, असा देखावा करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न झाला.
ऑडिओ रेकॉर्डिंग ठरलं महत्त्वाचा पुरावा
या कथित कटाचा पर्दाफाश करण्यासाठी अभिजित तायडे यांनी पोलिसांकडे एक पेनड्राईव्ह सुपूर्द केला आहे. यामध्ये मोबाईलवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग असून, त्यात खुनाचा कट कसा अंमलात आणायचा, याचे नियोजन असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी हा पुरावा जप्त केला असून तो तांत्रिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आला आहे.
राजकीय वैमनस्याची किनार
अचलपूर विधानसभा मतदारसंघात बच्चू कडू आणि तायडे कुटुंबातील राजकीय संघर्ष जुना आणि सर्वश्रुत आहे. याच राजकीय वादातून हा प्रकार घडला असल्याची शक्यता तक्रारीत वर्तवण्यात आली आहे. चांदूर बाजार पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत बच्चू कडू आणि गोलू माहोरे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 55, 58 आणि 61 नुसार गुन्हा नोंदवला आहे.
पुढील तपास सुरू
राजकीय आकसातून हा कट रचला गेला की यामागे अन्य काही आर्थिक किंवा वैयक्तिक कारणे आहेत, याचा सखोल शोध आता पोलीस घेत आहेत. या खळबळजनक प्रकरणामुळे केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.