अकोला: राजकीय कलहातून शिंदेंच्या शिवसेनेचा जन्म झाला. मात्र, अकोल्यात शिंदेंची शिवसेना आपल्याच पक्षातील वाद आणि फुटीनं हैराण झाली आहे. अन् यातूनच थेट पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरियांवर पैसे घेऊन पदं वाटल्याचा गंभीर आरोप पक्षातूनच करण्यात आला आहे.
शिंदेच्या शिवसेनेचे उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचे पुतळे आणि पोस्टर जाळणारे हे कार्यकर्ते, बाजोरियांच्या विरोधात 'बाजोरिया हटाव, शिवसेना बचाव' हे नारे देणारे कार्यकर्ते, हे सर्व करणारे कार्यकर्ते बाजोरिया यांच्याच शिवसेनेचे, याला कारण ठरलंय पक्षानं नियुक्त केलेले दोन नवे जिल्हाप्रमुख. भाजपचे माजी आमदार नारायणराव गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे गुरूजी यांना पक्षाने जिल्हाप्रमुख नियुक्त केलं आहे. या दोन्ही नियुक्त्या सेना उपनेते आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्या पुढाकाराने झाल्या. यातूनच आधीचे दोन जिल्हाप्रमुख अश्विन नवले आणि श्रीरंग पिंजरकर यांनी थेट बाजोरियांविरोधात रणशिंग फुंकलं. अन् या दोघांच्या नियुक्तीवरून थेट बाजोरियांवर पैसे घेऊन पद वाटल्याचा आरोप केलाय.
हेही वाचा : शेतकऱ्यांना कर्जमाफीची आस ; पुन्हा सावकारीचा फास
अकोला जिल्ह्यात एकूण सात तालुके आहेत. मात्र, सात तालुक्यांच्या अकोला जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेचे चार जिल्हाप्रमुख आहे. श्रीरंग पिंजरकर, अश्विन नवले, नारायणराव गव्हाणकर आणि चंद्रशेखर पांडे गुरूजी हे चार जिल्हाप्रमुख अकोल्यात आहेत. अलिकडेच बाजोरियांच्या पुढाकाराने गव्हाणकर आणि पांडे गुरूजी यांना जिल्हाप्रमुख नियुक्त करण्यात आलं आहे. यावरून अकोल्यात शिंदेंच्या शिवसेनेत प्रचंड दुफळी माजली आहे.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि त्यांच्या जबाबदाऱ्या
जिल्हाप्रमुख - जबाबदारी दिलेले मतदारसंघ
नारायणराव गव्हाणकर - बाळापूर, अकोट
चंद्रशेखर पांडे - मुर्तिजापूर
अश्विन नवले - अकोला पश्चिम
श्रीरंग पिंजरकर - अकोला पुर्व
दरम्यान, गोपीकिशन बाजोरियांनी हे सर्व आरोप फेटाळलेत. आपण या आरोपांना भिक घालत नसल्याचं बाजोरियांनी स्पष्ट केलं. पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर कारवाईचे संकेत बाजोरियांनी दिले.