Monday, June 23, 2025 12:13:57 PM

शक्तिपीठ महामार्गावरून वाद तापला; विनायक राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्गसह कोल्हापूर, वर्ध्यातील जैवविविधतेला धोका असून शेतजमिनींवर घाला येणार आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. १२ गावांचा सरकारविरोधात उठाव.

शक्तिपीठ महामार्गावरून वाद तापला विनायक राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून हा महामार्ग शेतकरी व बागायतदारांच्या हिताचा नसून ठेकेदार व मंत्र्यांच्या फायद्यासाठी रेटला जात असल्याचा गंभीर आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. रत्नागिरी ते नागपूर मोठा रस्ता सुरु असतानाही, नव्याने शक्तिपीठ महामार्गाचे प्रयोजन का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

शक्तिपीठ महामार्ग हा सुमारे 800 किलोमीटर लांबीचा असून त्यासाठी तब्बल 86 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या महामार्गामुळे सिंधुदुर्ग, कोल्हापूर, वर्धा या जिल्ह्यांतील अनेक शेतजमिनी आणि फळबागा बाधित होणार आहेत. त्यामुळे जैवविविधतेवर आणि पर्यावरणावर मोठा परिणाम होणार आहे. 300 फूट रुंदीच्या या महामार्गामुळे जंगल उध्वस्त होणार असून अनेक गावांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. याला स्थानिकांचा मोठा विरोध असून सिंधुदुर्गमधील 12 गावांनी याबाबत सरकारविरोधात उघडपणे आंदोलनाची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा:मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय का? सध्या 53 सक्रिय रुग्ण

राऊत यांनी स्पष्टपणे सांगितले की, विकासाला आमचा विरोध नाही. मात्र, विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या प्रकल्पांना आमचा ठाम विरोध राहणार आहे. 'शक्तीपीठ महामार्ग म्हणजे शेतकऱ्यांना नामशेष करणारा मार्ग आहे,'असे ते म्हणाले. नारायण राणेंनी दिलेल्या धमक्यांकडे लक्ष देत राऊत म्हणाले, 'हिम्मत असेल तर आमच्या तंगड्या तोडायला या', असा थेट इशाराच त्यांनी दिला.

सरकारकडून याआधी मुंबई-गोवा कोस्टल रोड, नागपूर महामार्ग आदी प्रकल्प सुरु आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून, नव्याने शक्तीपीठ महामार्गाची आवश्यकता नाही, असे राऊत म्हणाले. त्यांनी असा आरोपही केला की, सत्तेचा गैरवापर करून सरकार जबरदस्तीने जमीन संपादन करत आहे. मात्र, शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी हा प्रकल्प रेटत आहेत. पण स्थानिकांचा आक्रोश आणि पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेता, हा महामार्ग थांबवावा, अशी मागणी जोर धरत आहे. राऊत यांनी 12 बाधित गावांना भेट देण्याचे जाहीर केलं असून, ग्रामस्थांच्या समर्थनार्थ मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट केलं.


सम्बन्धित सामग्री