अजय घोडके, प्रतिनिधी, लातूर: शेतीच्या मशागतीसाठी पैसे नसल्याने सत्तरी ओलांडलेल्या वृद्ध दांपत्याने पत्नीसह स्वतःला नांगराला जुपल्याची बातमी व्हायरल झाल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात उमटले. याची दखल शरद पवार यांनी घेतली आणि शरद पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या पुढाकाराने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर शिष्टमंडळ पाठवले. या शिष्टमंडळाने शेतकरी अंबादास पवार व मुक्ताबाई पवार या वृद्ध दांपत्याला कर्जमुक्त केले आहे. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी वृद्ध शेतकरी दांपत्यांशी संवाद साधत मदतीचे आश्वासन दिले आहे.
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथील सत्तरीपार केलेले वृद्ध दांपत्य अंबादास पवार व मुक्ताबाई पवार यांनी शेतातील मशागतीसाठी पैसे नसल्याने स्वतःचं नांगर खांद्यावर घेऊन मशागत केली होती. या मशागतीचा व्हिडिओ समाज माध्यमात प्रचंड व्हायरल झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद राज्याच्या पावसाळी अधिवेशनात पडले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरले होते. या घटनेची दखल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली. त्यांनी प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या पुढाकाराने थेट शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांच्या कर्जाची पूर्ण रक्कम शेतकऱ्याला अदा करून कर्जमुक्त केले आहे. यावेळी राज्याचे माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख,जिल्हाध्यक्ष संजय शेटे, परमेश्वर घोगरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचा :मधुमेह असल्याने साखरेऐवजी गूळ खाताय? शुगरचं नाही तर डोक्याचा तापही वाढेल, जाणून घ्या...
हाडोळतीचे शेतकरी अंबादास पवार, मुक्ताबाई पवार या वृद्ध दांपत्याने ज्येष्ठ नेते शरद पवार, जयंतराव पाटील, सुप्रियाताई सुळे, जितेंद्र आव्हाड, रोहित पवार यांचे आभार मानले आहेत.