'Kanta Laga' girl Shefali Jariwala has passed away: बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री, मॉडेल आणि रिअॅलिटी शोमध्ये सहभागी झालेली ‘कांटा लगा’ गर्ल शेफाली जरीवाला हिचं निधन झालं आहे. वयाच्या केवळ 42 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये आणि इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
शेफाली जरीवालाने 2002 साली 'कांटा लगा' या रिमिक्स गाण्यातून पदार्पण केलं आणि त्या एका गाण्यामुळे ती घराघरात प्रसिद्ध झाली. या आयकॉनिक व्हिडिओने तिला ‘कांटा लगा गर्ल’ ही ओळख मिळवून दिली. त्यानंतर तिने मुझसे शादी करोगी आणि हुडुगारु या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. केवळ चित्रपटातच नव्हे, तर तिने बेबी कम ना, बू सबकी फटेगी या वेब सिरीजमधूनही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा: Bank Holidays in July 2025: जुलै 2025 मध्ये 13 दिवस बँकांना सुट्टी; राज्यनिहाय यादी जाहीर
रिअॅलिटी टीव्हीमध्येही शेफालीचा ठसा होता. नच बलिए 5, नच बलिए 7 आणि बिग बॉस 13 यासारख्या लोकप्रिय शोमध्ये तिचा सहभाग होता, ज्यातून तिची बहुआयामी प्रतिभा दिसून आली.
शुक्रवारी रात्री शेफालीची अचानक तब्येत बिघडली. तिचा पती पराग त्यागी आणि काही जवळचे मित्र तिला अंधेरीतील बेलेव्यू मल्टीस्पेशालिटी रुग्णालयात घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केलं. रुग्णालय प्रशासनाने तिच्या मृत्यूची पुष्टी केली असून पुढील तपासासाठी तिचं पार्थिव शवविच्छेदनासाठी कूपर रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
हेही वाचा: Weekly Horoscope June 29 to July 5: तुमच्यासाठी कसा असेल हा आठवडा? वाचा साप्ताहिक राशिभविष्य
शेफालीच्या अकाली जाण्याने तिचे चाहते आणि कलाविश्वातील सहकारी हळहळ व्यक्त करत आहेत. तिच्या अभिनयाने आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वाने तिने चाहत्यांच्या मनात कायमची जागा निर्माण केली होती.