Hundreds of Activists Join MNS: राज्यात पुढील काही महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून अनेक पक्षांतील नेते राजकीय समीकरणं ओळखून संबंधित पक्षात पक्षप्रवेश करत आहेत. काही आठवड्यांपूर्वी महाविकास आघाडीतील नेते आणि कार्यकर्ते महायुतीत प्रवेश करत होते, परंतु आता समीकरण उलटले आहे. यावेळी महायुतीला धक्का बसला आहे.
दहिसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गट आणि भाजपला मोठा धक्का बसला असून, शेकडो कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत (मनसे) प्रवेश केला आहे. मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्यात अविनाश अभ्यंकर आणि नयन कदम यांच्या उपस्थितीत या कार्यकर्त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.
हेही वाचा - NDA Seat Sharing in Bihar: बिहारमध्ये एनडीए अंतर्गत जागावाटप जाहीर; भाजप आणि जेडीयू प्रत्येकी किती जागा लढवणार? जाणून घ्या
दरम्यान, या पक्षप्रवेशानंतर बोलताना मनसे नेते अविनाश अभ्यंकर म्हणाले, खऱ्या विचारांच्या मागे जनता नेहमी उभी असते. थोडा वेळ लागतो, पण शेवटी सत्य जिंकतेच. दुसऱ्या पक्षात गेल्यानंतर कार्यकर्त्यांना कळलं की केवळ आश्वासनांवर काही होत नाही, त्यामुळे आता मनसेकडे लोकांचा ओघ वाढतो आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, महाराष्ट्रात मनसेची ताकद किती आहे, हे आगामी महापालिका निवडणुकीत दिसून येईल.
हेही वाचा - Thackeray Brothers Meet: BMC निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू ‘मातोश्री’वर पुन्हा एकत्र; कौटुंबिक जेवणाच्या निमित्ताने राजकीय समीकरणांवर चर्चा?
ठाकरे बंधूंच्या भेटींमुळे चर्चेला उधाण
तथापी, आज पुन्हा एकदा मनसेप्रमुख राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी ‘मातोश्री’वर गेले. गेल्या तीन महिन्यांत ही ठाकरे बंधूंची सातवी भेट ठरली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) युती होण्याच्या चर्चेला उधाणं आलं आहे. मात्र, या संभाव्य युतीवरून काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत महापालिकेतील राजकीय समीकरणे नव्याने रंगण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.