शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी ट्विटर (X) अकाऊंटवर एक खळबळजनक पोस्ट शेअर करत महाराष्ट्रातील जनतेच रक्त उसळून उठेल अस सत्य समोर आणलं आहे. महाराष्ट्राच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देणाऱ्या मुंबईतील वांद्रे किल्ल्यावर संताप उडवणारा व्हिडिओ जनतेसमोर आणला आहे. मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर रात्रीच्या सुमारास दारूपार्टी सुरू असल्याचा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
यावेळी किल्ल्यावरील या दारूपार्टीचे संयोजक ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग असल्याची खळबळजनक दावा अखिल चित्रे यांनी केला आहे. इतकचं नव्हे तर महाराष्ट्र सरकार, राज्य उत्पादन शुल्क विभाग, तसेच मुंबई महानगरपालिकेवर निशाणा साधत महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे, असा सवाल त्यांनी केला आहे. ऐतिहासिक वास्तूवर केलेल्या दारुपार्टीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावर अनेक लोकांच्या तीव्र संतापाच्या प्रतिक्रिया येत आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अखिल चित्रे यांनी पोस्ट करत म्हटलं आहे की, "महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या व नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि @mybmc @mybmcWardHW परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील ह्या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर 'महाराष्ट्र पर्यटन' विभाग ? नक्की काय सुरु आहे ? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे so called 'सांस्कृतिक मंत्री' आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर ह्याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे... हेच @BJP4Maharashtra भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती!"
दरम्यान ही घटना 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीची असल्याच त्यांनी पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलं आहे. तसेच सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे, हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती,’ अशी टीका त्यांनी केली आहे. त्याचसोबत स्थानिक रहिवाशांनीच व्हिडिओ शूट केल्याची माहिती अखिल चित्रे यांनी दिली आहे. या प्रकरणावर इतिहासप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेणार हे पाहण महत्त्वाच ठरणार आहे.