मुंबई: मुंबईच्या दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या वतीने पार्किंगसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
या नव्या नियमावलीनुसार, शिवाजी पार्क मैदानाच्या परिसरात पार्किंगसाठी ठराविक वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. पहाटे 5.30 ते रात्री 11.30 या वेळेत मैदानाला लागून पार्किंगला बंदी घालण्यात आली आहे. या वेळेत वाहन चालकांनी आपली वाहने मैदानाच्या विरुद्ध बाजूच्या रस्त्यावर पार्क करावीत. त्यानंतर रात्री 11.30 ते पहाटे 5.30 या वेळेत मात्र ही पार्किंग हटवून मैदानाच्या विरुद्ध बाजूस हलवण्यात येणार आहे.
शिवाजी पार्क परिसरात अनेक नागरिक आपली वाहने दीर्घकाळ पार्क करून अनुपस्थित राहत होते. यामुळे रस्त्यावरील जागा अडवल्या जात असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत होती. स्थानिक रहिवाशांच्या तक्रारी वाढल्यानंतर शिवाजी पार्क पोलिसांनी मुंबई महानगरपालिकेच्या मदतीने नवीन नियोजन सुरु केले आहे.
हेही वाचा: '...माझ्या कामामध्ये कन्नड ही माझी दुसरी भाषा आहे'; वादग्रस्त वक्तव्यामुळे सोनू निगम अडचणीत
नवीन नियमानुसार, ‘नो पार्किंग’चे फलक आणि वेळा दर्शवणाऱ्या पाट्या लावण्याचे काम वेगाने सुरु असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, यासाठी शिवाजी पार्क पोलिसांकडून मोटरसायकल पथक देखील तैनात करण्यात येणार आहे, जे नियमांचे पालन होत आहे की नाही हे तपासणार आहेत.
या नियमांची अंमलबजावणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास दातीर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात येत असून, त्यांनी स्पष्ट केले आहे की, 'शिवाजी पार्क परिसरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. कोणतीही शिथिलता खपवून घेतली जाणार नाही.'
नवीन नियमामुळे काही नागरिकांना सुरुवातीला गैरसोय होण्याची शक्यता असली तरी, दीर्घकालीन दृष्टीकोनातून या निर्णयामुळे शिवाजी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीत निश्चितच मोठा बदल होईल, असा विश्वास पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या या नियमांचे जनजागृतीसाठी प्रचार सुरु असून, वाहन चालकांनी सहकार्य करून वाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.