सुरेंद्र आकोडे, प्रतिनिधी, अमरावती: प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेनुसार अमरावती महापालिका हद्दीतील शाळांना खिचडी वाटप शाळा व्यवस्थापन समितीमार्फत महिला बचत गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ली असल्याचे मुख्याध्यापकांनी पोर्टलवर सादर केलेल्या माहितीनुसार समोर आले आहे. अमरावती महापालिकेच्या आठ शाळांमध्ये हा नियमबाह्य प्रकार झाला आहे, त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
हेही वाचा: नवी मुंबईत कोरोनाचे 19 रुग्ण; नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन
राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) शरद गोसावी यांनी पोर्टलवर सुट्टीच्या दिवशी शाळांनी उपस्थितीची नोंद केल्याबाबत ताशेरे ओढले आहेत. शाळांनी केलेल्या नोंदीच्या आधारे शाळांचे इंधन, भाजीपाल्याची देयके ऑनलाईन पद्धतीने जनरेट केली जातात आणि अनुदान शाळांच्या खात्यावर वर्ग केले जाते. परंतु, बहुतांश शाळांनी शासकीय सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी आहार घेतल्याची नोंद पोर्टलवर केली आहे. ही आहार चोरी पकडल्यामुळे जिल्हा परिषद व मनपा शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एएमएस पोर्टलवरील नोंदींचा आढावा घेण्याचे निर्देश शिक्षण संचालकांनी दिले आहेत. त्यामुळे आर्थिक फसवणूक करणाऱ्या शाळांविरुद्ध कडक प्रशासकीय कारवाई करण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना मिळाल्या आहेत.
हेही वाचा: पुराच्या पाण्यातून जीवाची बाजी लावून पाच जणांचे प्राण वाचवणारे 'खाकी वर्दीतील खरा हिरो'
शासकीय सुट्टीच्या दिवशी उपस्थितीची नोंद करणाऱ्या शाळा:
1 - महापालिका मराठी शाळा, बेनोडा
2 - महापालिका उर्दू गर्ल्स स्कूल नंबर 3, जुनीवस्ती बडनेरा
3 - महापालिका मराठी शाळा, अकोली
4 - संत गाडगे बाबा प्रायमरी स्कूल, शिवाजीनगर
5 - महापालिका प्रायमरी मराठी स्कूल नंबर 20, नवाथे नगर
6 - असोसिएशन उर्दू गर्ल्स हायस्कूल, चांदनी चौक, अमरावती
7 - महापालिका उर्दू प्रायमरी स्कूल नंबर 5, फ्रेजरपुरा, अमरावती