संभाजीनगर: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे सुपुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावर मानसिक आणि शारीरिक छळ, फसवणूक, धमकी व हुंड्याचे गंभीर आरोप करणाऱ्या विवाहित महिलेने आता आपले सर्व आरोप मागे घेतले आहेत. ‘हा आमचा घरगुती प्रश्न असून, यावर आणखी चर्चा नको,’ असे स्पष्ट करत तिने प्रकरणावर फुलस्टॉप दिला आहे.
सदर महिलेने काही दिवसांपूर्वी सिद्धांत शिरसाट यांच्यावर कायदेशीर नोटीस बजावत गंभीर आरोप केले होते. तिच्या वकिलांकडून सात दिवसांच्या आत न्याय न दिल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता. महिलेने २०१८ मध्ये सिद्धांत यांच्याशी ओळख झाल्याचं सांगत, 2022 मध्ये बौद्ध पद्धतीने विवाह झाल्याचेही पुरावे सादर केले होते. तिच्या आरोपांनुसार, सिद्धांत यांनी तिला आत्महत्येच्या धमक्या देत भावनिक ब्लॅकमेल करून लग्नासाठी तयार केलं, त्यानंतर शारीरिक संबंध आणि गर्भधारणेनंतर जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याचाही दावा केला होता.
या प्रकरणामुळे एकंदरीतच समाजात आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अनेक महिला हक्क कार्यकर्त्यांनी आवाज उठवत न्यायव्यवस्थेकडे लक्ष वेधलं होतं. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे पोलिस कारवाई होत नसल्याचंही आरोपकर्त्या महिलेच्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं होतं.
हेही वाचा: धक्कादायक माहिती उघड: मृत्यूपूर्वीही सुरू होती मारहाण; वैष्णवीच्या शरीरावर 29 खुणा, 6 ताज्या जखमांनी छळाचा धक्कादायक खुलासा
मात्र, आता या सर्व घडामोडींना कलाटणी देत संबंधित महिलेनं माध्यमांसमोर येत आपले आरोप मागे घेतले आहेत. ‘या प्रकरणाचे कुणीही राजकारण करू नये, हा आमचा खासगी प्रश्न आहे. यावर मी पूर्णविराम देत आहे,’ असे तिने सांगितले.
या नाट्यमय वळणामुळे या प्रकरणाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, खऱ्या घटनाक्रमावर अजूनही अनेक अनुत्तरित प्रश्न उरले आहेत. अशा प्रकारचे आरोप आणि त्यानंतरचे आरोप मागे घेणे, हे समाजात गंभीर चर्चा निर्माण करत असून, खऱ्या पीडितांसाठीही अशा घटनांचे परिणाम होऊ शकतात, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सिद्धांत शिरसाट प्रकरण आता खरोखरच थांबेल का, की यामध्ये आणखी काही खुलासे समोर येतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.