सिंधुदुर्ग: भारताच्या जलपर्यटन क्षेत्रात ऐतिहासिक पाऊल टाकत महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील निवती येथे देशातील पहिल्या जलपर्यटन प्रकल्पाची मुहूर्तमेढ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. हा सोहळा मंत्रालय, मुंबई येथून आज दुपारी 12 वाजता पार पडणार आहे.
या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, पर्यटन राज्यमंत्री इंद्रनील नाईक, पालकमंत्री नितेश राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निलेश राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या अनोख्या प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्गात पर्यटनाला नवे पर्व सुरू होणार आहे. निवती येथील खोल समुद्रात युद्ध नौका गुलजार आणली जाणार असून तिच्या साहाय्याने पाणबुडी प्रकल्प साकारण्यात येणार आहे. या पाणबुडी प्रकल्पाच्या माध्यमातून समुद्राच्या तळाशी एक अनोखे म्युझियम तयार होणार असून स्कूबा डायव्हिंगप्रेमींना आकर्षण ठरणारे उपक्रम राबवले जाणार आहेत.
माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी या संकल्पनेचा पाठपुरावा केला असून त्यांनी या प्रकल्पाला त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असे संबोधले आहे. 'या पाणबुडी प्रकल्पामुळे सिंधुदुर्गातील पर्यटन वाढेल, स्थानिकांना रोजगार मिळेल आणि भारताच्या पर्यटन नकाशावर सिंधुदुर्ग वेगळ्या उंचीवर जाईल,' असे मत त्यांनी व्यक्त केले.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या पाठबळामुळेच हे शक्य झाले आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहमतीने व सहकार्याने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रत्यक्षात येत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा आधीच निसर्गसंपन्न, स्वच्छ समुद्रकिनारे आणि सांस्कृतिक वारशामुळे पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे. परंतु हा जलपर्यटन प्रकल्प समुद्राच्या तळाशी अनुभव देणारा भारतातील पहिलाच उपक्रम असणार आहे. यामुळे देशी-परदेशी पर्यटकांची संख्या लक्षणीय वाढेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या प्रकल्पातून साकार होणारे अंडरवॉटर म्युझियम आणि स्कूबा डायव्हिंग सुविधा ही महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब ठरणार आहे. पर्यटनाच्या क्षेत्रात महाराष्ट्राने घेतलेले हे एक मोठे पाऊल मानले जात असून इतर राज्यांसाठीही हे उदाहरण ठरणार आहे.
सिंधुदुर्गच्या या ऐतिहासिक वाटचालीमुळे जिल्ह्याचे नाव जागतिक पर्यटन नकाशावर निश्चितच झळकणार आहे, असा विश्वास या सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने व्यक्त केला आहे.