पुणे : पिस्टलमधून गोळीबार करणाऱ्या आरोपींसह 6 जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. कोंढवा परिसरात गणपती मंडपाजवळ तरुणावर पिस्टलमधून गोळीबार केल्याची घटना घडली होती. मित्रासोबत झालेल्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप होता. गेल्या आठवड्यात 6 सप्टेंबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. दादू भालेराव आणि त्याच्या 8 ते 10 साथीदारांनी आरडाओरड करत दहशत निर्माण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दादू भालेराव याने पिस्टलमधून तरुणाच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप असून गोळी तरुणाच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत 6 आरोपींना अटक केली आहे.
जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव, लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या गजरमल, प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. तर दिनेश रामदास घाडगे, कार्तिक महादेव पांडागळे आणि विजय रामदास चोंधे यांनाही अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हस्तगत केले असून आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळाल्याची माहिती समोर येत आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गायडे करत आहेत.