तेजस मोहातुरे. प्रतिनिधी. नागपूर: उन्हाळ्यात थंडावा मिळावा आणि पावसाळ्यात उब मिळवण्यासाठी अनेकदा साप घरात शिरल्याच्या घटना तुम्ही टीव्हीवर किंवा फोनवर पाहिल्या असतील. मात्र, काय होईल जर तुमच्या लक्षात येईल की ज्या बेडवर तुम्ही उशी घेऊन झोपता, त्याच उशीखाली नाग आला तर? आश्चर्य वाटेल ना? परंतु, ही घटना प्रत्यक्षात झाली आहे.
हेही वाचा: 'बाधित झालेल्या इतर सर्व भागांसाठी एक पुनर्वसन पॅकेज तयार करण्याची मागणी...'; राहुल गांधींनी लिहिले मोदींना पत्र
नागपूरच्या महाजनवाडी येथील जैस्वालनगरमधील एका घरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. जैस्वालनगर येथे राहणाऱ्या पंकज कुरवे यांच्या घरात हा प्रकार घडला होता. जेव्हा पंकज कुरवे बेडवर झोपण्यासाठी आले, तेव्हा त्यांच्या निदर्शनात आले की त्यांच्या उशीखाली चक्क नागराज ठाण मांडून आहे. हे दृश्य पाहून ते थक्क झाले. मात्र, त्यांनी घाबरता न जाता प्रसंगावधान म्हणून सर्पमित्राला फोन केला आणि या घटनेची माहिती दिली. त्यानंतर सर्पमित्र समितीचे सदस्य आकाश मेश्रान तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि नागराजाला काळजीपूर्वक पकडून निसर्गाच्या कुशीत सुखरूप सोडले.
या घटनेमुळे नागपूरकरांना पावसाळ्यात सापांपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. साप उशाखाली किंवा घरात कुठेही लपून बसू शकतात, त्यामुळे स्वच्छता राखणे आणि घराची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे आहे.
हेही वाचा: जहाल नक्षलवादी हिडमा अटकेत; नक्षलवादी कारवाईत मोठं यश
यादरम्यान, सर्पमित्र समितीचे सदस्य म्हणाले, 'घरात साप येणे ही एक नैसर्गिक घटना आहे. मात्र, त्यांना त्रास न देता योग्यरित्या हाताळणे महत्वाचे आहे. साप पकडताना किंवा पाहताना घाबरू नका. अशावेळी तज्ञांची मदत घ्या'. या पावसाळ्यात नागपूरकरांनी अशा धोकादायक परिस्थिती टाळण्यासाठी घराच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.