अमोल दरेकर, प्रतिनिधी, सोलापूर: हुंडाबळी प्रकरणामुळे पुण्यात वैष्णवी हगवणे या विवाहितेचा बळी गेल्याच्या प्रकरणानंतर सोलापूर जिल्ह्यातील टेंभूर्णी येथे दीर आणि जावांनी मिळून विवाहितेला अमानुष मारहाण केली. एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी त्या विवाहितेला विष पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 'दीरांनी सर्वांसमोर विवाहितेचा अत्याचार केला आहे', असेही विवाहितेने आरोप केला आहे. यामध्ये नवऱ्यानेही सर्वांना साथ दिल्याची माहिती मिळाली आहे. सध्या या पीडित विवाहितेवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन्ही महिलांसोबत आणखी चौघांविरोधात टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: सासरच्या जाचाला कंटाळून आणखी एका विवाहितेची आत्महत्या
नेमकं प्रकरण काय?
11 मे 2025 रोजी सकाळी सुमारे 10 वाजता पीडित महिला काम करत होती. त्यावेळी आरोपी दोन्ही दीर सकाळी सुमारे 11:30 वाजता घरात आले. त्यानंतर पीडितेला ओढत घराच्या हॉलमध्ये आणले. तिथे शिवीगाळ देऊन तिचा विनयभंग केला. त्यावेळी तिथे आलेल्या दोन जावा, निलिता आणि पूजा, हातात काठ्या आणि रॉड घेऊन होत्या. त्यांनी त्या काठ्या आणि रॉड आरोपी दीरांच्या हातात दिल्या आणि म्हणाल्या, 'आता तुझी जिरवतो.' त्यानंतर त्यांनी काठी आणि रॉडने पीडितेच्या मांडी, पाठ, पाय, हात तसेच कानावर अमानुष मारहाण केली. यामध्ये पीडित विवाहिता गंभीर जखमी झाली. शिवाय, त्यांनी विष पाजून विवाहितेला जीवे मारण्याचा प्रयत्नही केला. दोन्ही जावांनीही तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली.
पीडित महिला मारहाण सहन करू शकत नसल्यामुळे ती जोरजोराने ओरडत होती, पण घराचा दरवाजा बंद होता. रात्री सुमारे 9 वाजता तिच्या मुलाने तिला दवाखान्यात नेले. तिथून पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी पुरावा म्हणून दवाखान्याची यादी त्यांना दिली. यामध्ये, पीडित विवाहितेच्या कानाला गंभीर दुखापत झाली असून कानाचा पडदा फाटल्याचे सांगण्यात आले आहे. नातेवाईकांच्या मते, 'आरोपींपैकी एक वकील असल्यामुळे पोलिस कोणतीही कारवाई करत नाहीत आणि सर्व आरोपी अद्याप फरार आहेत.'
या प्रकरणी, पीडित महिलेने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस महानिरीक्षक, महिला आयोग अध्यक्ष यांना पाठविलेल्या निवेदनात आरोपींवर गंभीर आरोप केले आहेत. सध्या या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.
हेही वाचा: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी राजेंद्र आणि सुशील हगवणेंनी थार जप्त
पीडित महिलेच्या वडिलांनी आणि भावाची मागणी:
2007 मध्ये पीडित चित्रा भोसले यांचं सतीश भोसले यांच्याशी लग्न झाले होते. त्यानंतर, हुंड्यासाठी चित्राच्या सासरच्यांनी चित्राला त्रास देण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये सासरच्या मंडळींविरुद्ध चित्राने 498 कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दोन वर्षांनंतर भोसले कुटुंबीयांनी चित्राला नांदवण्यासाठी लेखी हमी देखील दिली होती. तेव्हा, पीडित चित्रा सासरी राहण्यासाठी गेली होती. पण सासरी आल्यानंतर दीर आणि जावांनी मिळून पुन्हा चित्राला त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच, चित्राला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही नातेवाईकांनी केला आहे. 'पीडितेच्या दीर आणि जावांविरुद्ध वाढीव कलम लावून अटक व्हावी,' अशी मागणी चित्राचे वडील आणि भाऊ यांनी केली आहे.