Monday, May 11, 2026 10:38:44 AM

Solapur News: आकस्मित मृत्यूचा बनाव, पण शेवटी...; सोलापुरात सख्ख्या बहिणीनेच भावाला संपवलं, धक्कादायक कारण उघड

सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील केम येथे आढळलेल्या मृतदेहाचे गूढ 24 तासांत उलगडले.

solapur news आकस्मित मृत्यूचा बनाव पण शेवटी सोलापुरात सख्ख्या बहिणीनेच भावाला संपवलं धक्कादायक कारण उघड

सोलापूर : करमाळा तालुक्यातील केम परिसरात सापडलेल्या एका व्यक्तीच्या मृतदेहाच्या प्रकरणाचा अवघ्या 24 तासांत उलगडा करत पोलिसांनी धक्कादायक सत्य समोर आणले आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंदवलेल्या या प्रकरणात प्रत्यक्षात हा गुन्हा असल्याचे स्पष्ट झाले असून, मृत व्यक्तीच्या सख्ख्या बहिणीनेच पतीच्या मदतीने ही घटना घडविल्याचे तपासातून उघड झाले आहे. 12 एप्रिल रोजी केम गावातील एका शेताजवळ विहिरीच्या कडेला एका मक्याच्या गंजीजवळ 38 वर्षीय मल्हारी कांबळे यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्राथमिक चौकशीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, शवविच्छेदन अहवालात गळा आवळल्यामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची दिशा बदलली.

पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. मृत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांची चौकशी करताना पोलिसांना काही विसंगती आढळली. विशेषतः मृताची बहीण शितल केंगारे आणि तिचा पती राजेश केंगारे यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले. सुरुवातीला दोघांनीही टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीत शितलने अखेर संपूर्ण प्रकार कबूल केला. तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, मल्हारी कांबळे यांना दारूचे गंभीर व्यसन होते. या व्यसनामुळे घरात वारंवार वाद होत असत. 11 एप्रिलच्या रात्रीही ते मद्यधुंद अवस्थेत घरी आले आणि बहिणीशी वाद घालू लागले. या सततच्या त्रासाला कंटाळून आणि रागाच्या भरात शितलने आपल्या ओढणीने भावाचा गळा आवळला. या घटनेत त्याचा मृत्यू झाला.यानंतर, शितल आणि तिचा पती राजेश यांनी पुरावे लपवण्यासाठी मृतदेह घरातून हटवून शेतात नेऊन टाकला. त्यामुळे सुरुवातीला हा मृत्यू संशयास्पद वाटला नव्हता. मात्र, पोलिसांच्या तत्पर तपासामुळे संपूर्ण कट उघडकीस आला.या प्रकरणात पोलिसांनी शितल केंगारे आणि राजेश केंगारे यांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने वेगाने काम करत गुन्ह्याचा उलगडा केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, कौटुंबिक वादातून घडलेल्या या प्रकाराने सर्वांनाच धक्का बसला आहे.


सम्बन्धित सामग्री

ताज्या बातम्या




ताज्या बातम्या