सोलापूर: सोलापूर महानगरपालिका निवडणुकीचे निकाल म्हणजे राजकीय भूकंपाचे धक्के ठरले आहेत. सर्वात मोठा धक्का बसला आहे तो काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना. ज्या प्रभागात खुद्द खासदारांचे निवासस्थान आहे, त्याच प्रभाग 23 मध्ये भारतीय जनता पक्षाने महाविकास आघाडीचा अक्षरशः ‘सुफडा साफ’ केला आहे. सोलापूरच्या या बालेकिल्ल्यात भाजपने आपले वर्चस्व सिद्ध करत काँग्रेसच्या चिंतेत भर टाकली आहे.
प्रभाग 23: प्रतिष्ठेच्या लढतीत भाजपचा वरचष्मा
प्रभाग 23 मध्ये महाविकास आघाडीने मोठी ताकद लावली होती. काँग्रेसच्या दीपाली शहा, शिवसेना (ठाकरे गट) कडून माजी महापौर अलका राठोड, लक्ष्मण जाधव आणि राष्ट्रवादी (तुतारी) कडून सुनीता रोटे असे तगडे उमेदवार मैदानात होते. मात्र, भाजपने या चक्रव्यूहात शिरून आघाडीच्या सर्व उमेदवारांना धूळ चारली. भाजपच्या आरती वाकसे यांनी दीपाली शहांचा, तर ज्ञानेश्वरी देवकर यांनी अलका राठोड यांचा पराभव केला. कैकाडी समाजाचे नेते लक्ष्मण जाधव यांनाही राजशेखर पाटील यांच्याकडून पराभव पत्करावा लागला.
हेही वाचा: BMC Election Results 2026: मुंबईत 'ठाकरे फॅक्टर' फेल? महायुतीची सुसाट मुसंडी; देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेत सत्तांतराचे संकेत?
धक्कादायक निकाल: तुरुंगातून भाजपच्या शालन शिंदे विजयी!
सोलापूरच्या राजकीय इतिहासात प्रभाग 2 मधील निकाल सर्वाधिक धक्कादायक मानला जात आहे. मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या भाजप उमेदवार शालन शिंदे यांनी चक्क तुरुंगातूनच विजयाचा झेंडा फडकवला आहे. अर्ज मागे घेण्यावरून झालेल्या वादातून 2 जानेवारीला हत्या झाली होती, ज्यामध्ये शालन शिंदे आरोपी आहेत. प्रचारासाठी प्रत्यक्ष मैदानात नसतानाही त्यांनी शिवसेनेच्या आफ्रिन पठाण यांचा 10,767 मतांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयाने सोलापूरच्या राजकारणात ‘क्राइम आणि पॉलिटिक्स’च्या नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
भाजपची घोडदौड: प्रभाग 19 आणि 23 वर ताबा
भाजपने केवळ प्रभाग 23 नव्हे, तर प्रभाग 19 मध्येही आपला दबदबा कायम राखला आहे. प्रभाग 19 मध्ये भाजपच्या कविता जंगम, व्यंकटेश कोंडी, कलावती गडगे आणि बसवराज केंगनाळकर या चौघांनीही दणदणीत विजय मिळवला आहे. तर प्रभाग 23 मध्ये सत्यजित वाघमोडे, आरती वाकसे, ज्ञानेश्वरी देवकर आणि राजशेखर पाटील यांनी संपूर्ण पॅनल निवडून आणले आहे. शिस्तबद्ध नियोजन आणि मतदारांपर्यंत पोहोचण्याची भाजपची रणनीती पुन्हा एकदा यशस्वी ठरली आहे.
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला खिंडार: ‘महाविकास’चे गणित कोलमडले
प्रणिती शिंदे खासदार झाल्यानंतर या महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला मोठी आशा होती. मात्र, त्यांच्या राहत्या प्रभागातच भाजपचा पॅनल विजयी झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी धोक्याची घंटा वाजली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार वैयक्तिकरीत्या सक्षम असूनही पॅनलच्या ताकदीसमोर त्यांना नमतं घ्यावं लागलं. भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र डॉ. किरण देशमुख यांनी प्रभाग 2 च्या भाजप पॅनलचे यशस्वी नेतृत्व केले, ज्याचे फळ त्यांना या निकालांच्या रूपाने मिळाले आहे.
सोलापूर महानगरपालिकेच्या या सुरुवातीच्या निकालांनी राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे. प्रभाग 23 आणि 2 मधील धक्कादायक निकालांनंतर आता सर्वांच्या नजरा उरलेल्या प्रभागांकडे लागल्या आहेत. भाजप आपली ही आघाडी कायम राखणार की महाविकास आघाडी 'कमबॅक' करत चित्र पालटणार? अद्याप अनेक फेऱ्यांची मतमोजणी बाकी असल्याने सोलापूरचा नवा 'महापौर' कोणाचा होणार, याचा सस्पेन्स कायम आहे.
हेही वाचा: BMC Election Results 2026 : मुंबईत भाजपचाच महापौर बसणार; मुंबईतील भाजपच्या विजयी हॅटट्रिकवर आशिष शेलारांची प्रतिक्रिया