अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा आणि राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेली राज्यसभेची जागा कोणाला मिळणार? राष्ट्रवादीच्या कोणत्या नेत्याची वर्णी राज्यसभेवर लागणार? याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. त्यानंतर आता मोठी बातमी समोर येत आहे.
सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर राष्ट्रवादीतील नाही तर भाजप नेत्याची वर्णी लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. सुनेत्रा पवारांची राज्यसभेची रिक्त जागा नवनीत राणा यांना मिळण्याची शक्यता वर्तावली जात आहे. याचपार्श्वभूमिवर राणा दांपत्य ॲक्शन मोडमध्ये आले असून नवनीत राणा आणि आमदार रवी राणा आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. कालच राणा दांपत्याने मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ निवासस्थानी जवळपास एक तास भेट घेऊन चर्चा केली होती.
यावेळी नवनीत राणा यांनी काल सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचीही भेट घेतली होती. या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांची नावे चर्चेत होती. मात्र आता भाजपने या जागेवर दावा करण्याची रणनीती आखल्याचे संकेत मिळत आहेत. येत्या काही दिवसांत या संदर्भातील निर्णय स्पष्ट होणार असून राज्याच्या राजकारणात विविध तर्क-वितर्काना उधाण आले आहे.