Monday, January 19, 2026 07:26:57 PM

Soyabean Rate Increase: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! सोयाबीनला बाजारात मोठी दरवाढ

सीड क्वालिटी दरात दीड हजारांची वाढ झाली असून शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. दर आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

soyabean rate increase शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता सोयाबीनला बाजारात मोठी दरवाढ

वाशिम: राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी मागील दोन दिवसांत आशादायक घडामोड समोर आली आहे. बाजारात सोयाबीनच्या भावामध्ये अचानक वाढ दिसत असून शेतकऱ्यांकडून होत असलेल्या उच्च भावाच्या मागणीला आता बाजारही प्रतिसाद देताना दिसत आहे. राष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या मागणीमुळे सोयाबीन दरात मोठी वाढ नोंदवली जात आहे.

सध्या देशभरात सोयाबीन तेलाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेल प्रक्रिया उद्योगांकडून खरेदीचा वेग वाढल्याने बाजारात तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच यंदाच्या खरिपात सोयाबीन पेरणी क्षेत्र घटल्याने आवकही कमी झाली आहे. परिणामी मागणी-पुरवठा यात समतोल बिघडत असून दर सातत्याने वाढत आहेत. नाफेडनेही सोयाबीन खरेदीला सुरुवात केल्याने बाजाराला आणखी आधार मिळत आहे.

हेही वाचा: Vande Mataram Discussion: संसदेत ‘वंदे मातरम्’चा ऐतिहासिक आढावा; मोदी आणि शाह करतील नेतृत्व

बाजारात फक्त दोन दिवसांत सोयाबीन दरात मोठी झेप पाहायला मिळाली आहे. सीड क्वालिटी सोयाबीनच्या भावात तब्बल दीड हजार रुपयांची वाढ झाली असून मील क्वालिटीचे दरही पाच हजार रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. वाशिम बाजार समितीत दोन दिवसांपूर्वी बिजवाई सोयाबीनला तब्बल 5 हजार 800 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाल्याची नोंद आहे.

शेतकऱ्यांच्या मते, गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनला योग्य भाव मिळत नसल्याने त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत होता. मात्र आता दरात झालेल्या या वाढीमुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. अनेक बाजार तज्ज्ञांचे मत आहे की, पुढील काही दिवसांत मागणी वाढत राहिल्यास सोयाबीनचे दर हमीभावाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये आवक कमी आणि मागणी वाढल्याने वातावरण शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनुकूल बनत आहे. दर स्थिर राहिल्यास किंवा आणखी वाढल्यास शेतकऱ्यांना हंगामाचा चांगला फायदा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Maharashtra Winter Session: मिलिंद साठे महाधिवक्ता, शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा; हिवाळी अधिवेशनाआधी सरकारचे दोन मोठे निर्णय


सम्बन्धित सामग्री