मुंबई: राज्यात गावखेड्यापासून ते शहरापर्यंत लोक एसटीने प्रवास करतात. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे सरकारने प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना एसटी बसचे लोकेशन कळावे यासाठी 'आपली एसटी' या नावाने नवीन ॲपचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण करण्यात आले.
आपली एसटी या ॲपवर 12 हजारांपेक्षा जास्त बस व राज्यभरातील एक लाखांपेक्षा जास्त मार्गाचे मॅपिंग केले आहे. भविष्यात सर्व एसटी बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येणार आहेत. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवाशांच्या सोयीसाठी काॅम्प्युटर ॲप नव्या रूपात सादर केले आहेत. त्यामुळे आता या ॲपला 'आपली एसटी' असे नाव दिले आहे. या ॲपमुळे सर्वसामान्य प्रवाशांचा प्रवास सोयीस्कर आणि पारदर्शक होणार आहे.
हेही वाचा: Maharashtra Electricity Rate Increase: दिवाळीच्या मुहूर्तावर वीजबिल वाढणार, महावितरणकडून ग्राहकांना फटका
आपली एसटी ॲपद्वारे प्रवाशांना आपल्या जवळच्या बसस्थानकाची माहिती मिळणार आहे. तसेच बस कुठून सुटणार आणि ती बस थांब्यावर केव्हा पोहोचणार याचीही माहिती मिळणार आहे. त्यामुळे प्रवाशांना थांब्यावर थांबून वेळ घालवण्याची गरज नाही, तर ते थेट बसच्या वेळेनुसार थांब्यावर पोहोचू शकतील. ॲपमध्ये अँड्रॉइड आणि ॲपल युजरसाठी अनेक उपयुक्त सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यात प्रवाशांना आपल्या जवळच्या बस थांब्याचा शोध घेणे, दोन थांब्यांदरम्यान चालणाऱ्या बसच्या वेळापत्रकाची माहिती पाहणे, आरक्षण केलेल्या तिकीटातील बस क्रमांक टाकून बसचा थेट मागोवा घेणे, यांचा समावेश आहे. याशिवाय प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ॲपमध्ये आपत्कालीन क्रमांकांची यादी देखील देण्यात आली आहे. यामुळे एकाच क्लिकमध्ये कोणत्याही आपत्कालीन क्रमांकावर कॉल करता येणार आहे.
सध्या या ॲपवर राज्यातील तब्बल 12 हजाराहून अधिक बसेसचे लाइव्ह डेटा उपलब्ध आहे. भविष्यात सर्व बसेस या ॲपच्या कार्यकक्षेत येतील. पुढे प्रवाशांच्या प्रतिक्रियांच्या आधारे ॲपमध्ये आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. एसटीचा उद्देश प्रवाशांना अधिक विश्वासार्ह, पारदर्शक आणि सुरक्षित सेवा देण्याचा आहे. तसेच आपली एसटी ॲप या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे, मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.