Sunday, March 08, 2026 12:35:17 PM

ST Workers Protest : ST कर्मचाऱ्यांची 24 तारखेला आंदोलनाची हाक; सरकारच्या निषेधार्थ आझाद मैदानात करणार 'बोंब मारो' आंदोलन

वेतनवाढ आणि थकीत फरकाची रक्कम न मिळाल्याने कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले असून, येत्या 24 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारच्या निषेधार्थ 'बोंब मारो' आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे.

st workers protest  st कर्मचाऱ्यांची 24 तारखेला आंदोलनाची हाक सरकारच्या निषेधार्थ आझाद मैदानात करणार बोंब मारो आंदोलन

ST Workers Protest : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. वेतनवाढ आणि थकीत फरकाची रक्कम न मिळाल्याने कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले असून, येत्या 24 फेब्रुवारी रोजी मुंबईतील आझाद मैदानावर सरकारच्या निषेधार्थ 'बोंब मारो' आंदोलन करण्याची हाक देण्यात आली आहे. हक्काचे पैसे वेळेवर मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट असून, प्रशासकीय दिरंगाईचा निषेध करण्यासाठी हजारो कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

अर्थ खात्याची आडकाठी? निधीअभावी महामंडळाची तिजोरी रिकामी
कामगार संघटनेच्या नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन महिन्यांपासून एसटी महामंडळाला अर्थ खात्याकडून आवश्यक निधी प्राप्त झालेला नाही. या संदर्भात वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला असून खुद्द परिवहन मंत्र्यांनीही अर्थ खात्याकडे पाठपुरावा केला, परंतु अद्याप तोडगा निघालेला नाही. महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून दोन महिने फरकाचा हप्ता दिला, मात्र आता महामंडळाकडेच पैसे शिल्लक नसल्याने वेतनवाढीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकारने निधी जाहीर करूनही तो प्रत्यक्षात का मिळत नाही, असा संतप्त सवाल कर्मचारी विचारत आहेत.

6,500 रुपयांच्या पगारवाढीचे आश्वासन हवेतच; कर्मचाऱ्यांचा विश्वासघात
राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा 6,500 रुपयांची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, केवळ दोन महिने हे वाढीव पैसे मिळाल्यानंतर हा हप्ता अचानक बंद झाला. सरकारने दिलेले आश्वासन न पाळणे हा कर्मचाऱ्यांचा विश्वासघात आहे, अशी तीव्र भावना कामगार नेते संदिप शिंदे यांनी व्यक्त केली असून, आता आरपारची लढाई लढण्याचा पवित्रा घेतला आहे.

हेही वाचा - Chhagan Bhujbal: 100 टक्के ठरलं! सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष, भुजबळांची स्पष्टोक्ती; विलीनीकरणाच्या मुद्द्याला मात्र बगल

प्रताप सरनाईक यांच्या मध्यस्थीनंतरही निर्णय शून्य
दरम्यान, वेतनवाढीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कर्मचारी प्रतिनिधींनी आमदार प्रताप सरनाईक यांची भेट घेतली होती. गेल्या आठवड्यात झालेल्या या भेटीत सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 120 कोटी रुपयांच्या फाईलवर स्वाक्षरी करून पगारवाढीचा प्रश्न कॅबिनेटमध्ये निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर कॅबिनेट बैठक होऊनही पदरात काहीच न पडल्याने कर्मचाऱ्यांचा संयम सुटला आहे. आश्वासनांची पूर्तता होत नसल्याने आता थेट आझाद मैदानावरच बोंब मारून सरकारचे लक्ष वेधण्याचा निर्णय कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
 


सम्बन्धित सामग्री