Friday, March 13, 2026 10:11:40 PM

MSRTC Strike : ST कर्मचाऱ्यांचा एल्गार; 3 दिवसांत 'या' मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

येत्या तीन दिवसांत यावर ठोस तोडगा न निघाल्यास राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प करण्याचा म्हणजेच 'चक्का जाम' करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

msrtc strike  st कर्मचाऱ्यांचा एल्गार 3 दिवसांत या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा

MSRTC Strike : राज्य परिवहन (एसटी) महामंडळाच्या प्रवाशांसाठी येणारा काळ कठीण जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्य सरकारने आश्वासन देऊनही एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाचा फरक (Salary Arrears) अद्याप दिलेला नाही. यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणावर संतापाची लाट उसळली आहे. येत्या तीन दिवसांत यावर ठोस तोडगा न निघाल्यास राज्यातील एसटी सेवा पूर्णपणे ठप्प करण्याचा म्हणजेच 'चक्का जाम' करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

नेमका वाद काय?
या वादाची मुळे ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत आहेत. त्यावेळी उपमुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनासाठी दरमहा 65 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून सरकारने हा निधी महामंडळाला उपलब्ध करून दिलेला नाही. मध्यंतरीच्या काळात महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून दोन महिने हा फरक दिला, पण आता निधीअभावी यंदाचा पगार वाढीव फरकाशिवाय करण्यात आला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

हेही वाचा - Solapur News : सोलापूर-मराठवाडा रेल्वेसाठी राज्य शासनाकडून 150 कोटी मंजूर; रखडलेल्या प्रकल्पाला मोठा बूस्टर

तीन दिवसांचा 'अल्टिमेटम'
महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी काँग्रेसचे नेते श्रीरंग बरगे यांनी सरकारला याप्रकरणी निर्वाणीचा इशारा दिला आहे. महामंडळावर आधीच 4200 कोटींचे कर्ज असताना कर्मचाऱ्यांची ही अडवणूक म्हणजे त्यांची थट्टा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 10 फेब्रुवारीपर्यंत सरकारने 116.69 कोटींची थकीत रक्कम जमा न केल्यास, रीतसर नोटीस देऊन राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असे बरगे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना
"राज्य सरकारने स्वतःचा शब्द पाळलेला नाही. येत्या तीन दिवसांत कर्मचाऱ्यांच्या खात्यात वाढीव वेतन न जमा झाल्यास, एसटीची चाके थांबवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरणार नाही," असे स्पष्ट मत कामगार नेत्यांनी व्यक्त केले आहे. या इशाऱ्यामुळे 10 फेब्रुवारीनंतर एसटी सेवा विस्कळीत होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करताना पर्यायी व्यवस्थांचा विचार करणे सध्या हिताचे ठरेल.


सम्बन्धित सामग्री