ST Employee Code of Conduct: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवी आचारसंहिता जाहीर केली आहे. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी जारी केलेल्या अधिकृत परिपत्रकानुसार, कर्मचाऱ्यांनी ऑन-ड्यूटी अथवा गणवेशात असताना रील्स, व्हिडिओ किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग केल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. एसटीची प्रतिमा मलिन होण्यापासून रोखणे आणि सुरक्षेचे नियम पाळणे हा या निर्णयामागील मुख्य उद्देश आहे.
कर्तव्यावर असताना व्हिडिओ, रील्स आणि गोपनीय माहिती शेअर करण्यावर पूर्ण बंदी
नवीन नियमांनुसार चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांना एसटी बस, आगार, बसस्थानक किंवा कार्यालयीन परिसरात गणवेशात व्हिडिओ अथवा रील्स बनवण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. वाहन चालवताना शॉर्ट्स, रील्स किंवा लाईव्ह स्ट्रीमिंग करण्यावर सक्त बंदी घालण्यात आली असून महामंडळाशी संबंधित गोपनीय माहिती, संवेदनशील फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यास अटकाव करण्यात आला आहे. सकारात्मक आशयाचे व्हिडिओ पोस्ट करायचे असल्यास संबंधित सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य राहील. नियम मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.
हेही वाचा – Raigad: कर्जत-खोपोली महामार्गावर कार-दुचाकीची समोरासमोर धडक; महिलेचा जागीच मृत्यू, एक जण गंभीर जखमी
प्रवासी सुविधा आणि रस्ते सुरक्षेच्या प्रचारासाठी ‘इन्फ्लुएन्सर’ कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन
दुसरीकडे, सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा वापर महामंडळाच्या हितोद्देशासाठी करून घेण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रवासी सुविधा, स्वच्छता मोहीम, लोककल्याणकारी उपक्रम आणि रस्ते सुरक्षेचा प्रसार करण्यासाठी एसटीतील इन्फ्लुएन्सर कर्मचाऱ्यांना नियमांच्या अधीन राहून प्रोत्साहन दिले जाईल. यासाठी विभाग स्तरावर संवाद बैठका घेऊन कर्मचाऱ्यांना अधिकृत माहिती पुरवली जाईल. तसेच, मध्यवर्ती कार्यालयाच्या जनसंपर्क शाखेकडे अशा सक्रिय कर्मचाऱ्यांची माहिती संकलित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.