अहिल्यानगर: आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सातत्याने वाढत असलेल्या साखरेच्या दरांमध्ये आता मोठी घसरण झाली आहे. काही दिवसांपूर्वी किरकोळ बाजारात साखर 75 ते 80 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती. मात्र आता दर 60 ते 62 रुपये प्रतिकिलोपर्यंत खाली आल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ठोक बाजारातही साखरेच्या दरात तब्बल 700 ते 800 रुपयांची घसरण झाल्याचे समोर आले आहे.
व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ठोक बाजारात साखरेचा दर 7200 रुपये प्रतिक्विंटल होता. तो आता 6200 रुपयांपर्यंत घसरला आहे. म्हणजेच क्विंटलमागे सुमारे एक हजार रुपयांची घट नोंदवली गेली असून, किरकोळ बाजारात त्याचा परिणाम प्रतिकिलो 8 ते 10 रुपयांच्या दरकपातीच्या रूपाने दिसून येत आहे.
गणेशोत्सव, नवरात्र, दिवाळी आणि इतर सणांच्या काळात मिठाई, फराळ आणि विविध खाद्यपदार्थांसाठी साखरेची मागणी वाढते. त्यामुळे साखरेचा दर शंभरीच्या उंबरठ्यावर जाईल, अशा चर्चा रंगल्या होत्या. मात्र सध्या बाजारात साखरेचा मुबलक साठा उपलब्ध असल्याने अशा सर्व शक्यता फोल ठरल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
व्यापाऱ्यांच्या मते, साखरेचे दर केवळ मागणी-पुरवठ्यावरच नव्हे तर शासनाच्या धोरणांवरही मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. साखर निर्यात, इथेनॉल धोरण, ऊस गाळपाचा हंगाम आणि उत्पादनाचा अंदाज या घटकांमुळे दरात चढ-उतार होत असतात. त्यामुळे पुढील काळातही दरातील स्थिती शासनाच्या निर्णयांवर अवलंबून राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान,अहिल्यानगरात साखरेच्या किमती कमी झाल्यामुळे मिठाई उत्पादक, बेकरी व्यावसायिक, हॉटेल व्यवसाय आणि सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. आगामी सणांसाठी मोठ्या प्रमाणात साखरेची खरेदी करणाऱ्या कुटुंबांनाही या दरकपातीचा थेट फायदा होणार आहे.