नाशिक: शिवसेना (ठाकरे गट) मध्ये पुन्हा प्रवेश करताना माजी नगरसेविका सुजाता शिंगाडे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. 'शिंदे गटात जाणं ही माझी चूक होती,' असं स्पष्टपणे सांगत त्यांनी ठाकरे गटात पुनर्प्रवेश करताना नाशिकमधील राजकारणातील काही धक्कादायक बाबी उघड केल्या.
सुझाता शिंगाडे यांनी 30 जानेवारी रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला होता. पण केवळ काही महिन्यांतच त्यांचा भ्रमनिरास झाला आणि त्यांनी पुन्हा ठाकरे गटाचा हात धरला. 'खरी शिवसेना हीच आहे,' असं ठाम सांगत त्यांनी शिंदे गटातील राजकारणावर गंभीर आरोप केले.
त्यांच्या म्हणण्यानुसार, नाशिकमध्ये नगरसेवक होण्यासाठी थेट पैसे घेतले जात आहेत. 'नगरसेवकासाठी दोन कोटी रुपये घेत आहेत,' असा थेट आरोप त्यांनी केला. यामुळे शिंदे गटात पक्षनिष्ठा नव्हे तर आर्थिक व्यवहार अधिक महत्त्वाचे ठरत असल्याचा संकेत त्यांनी दिला.
'मी लहानपणापासून म्हणजे वयाच्या दहाव्या वर्षापासून शिवसेनेत आहे. मी काही कोणाची मिंधी नाही. पण काही लोकांच्या आमिषाला बळी पडले. काही एजंटसारखी माणसं मधे फसवतात. मलाही फसवण्यात आलं. पण आता मी पुन्हा माझ्या घरात परत आली आहे. याबद्दल मला खंत वाटते आणि मी दिलगिरी व्यक्त करते,' असे भावनिक वक्तव्य त्यांनी केलं.
हेही वाचा: लाडकी बहीण योजना: लाडकी बहीण योजनेसाठी पुन्हा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला
ठाकरे गटाच्या पक्षप्रवेश सोहळ्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचीही उपस्थिती होती. अनेक शिवसैनिकांनी या सोहळ्यात सहभागी होत पुन्हा ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी शिंगाडेंनी स्पष्टपणे सांगितले की, 'मां साहेबांच्या जागी आज वहिनीसाहेब उभ्या आहेत. त्या शिवसेना सांभाळत आहेत.'
त्यांनी इतर नाराज कार्यकर्त्यांनाही आवाहन केलं की, 'जे गेले आहेत, त्यांनी परत यावं. इथं आपलं घर आहे, आपली संघटना आहे. खरी शिवसेना हीच आहे.'
शिंगाडे यांचा हा गौप्यस्फोट केवळ नाशिकपुरता मर्यादित न राहता राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे. सध्या अनेक नेते शिंदे गटातून नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत. अशा वेळी शिंगाडे यांच्या पुनर्प्रवेशामुळे ठाकरे गटाला राजकीय बळ मिळण्याची शक्यता आहे.