Maharashtra Shiv Sena Party Name Case: शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण चिन्हाच्या अधिकारावरून सर्वोच्च न्यायालयात पार पडलेली सुनावणी पूर्ण झाली असून या प्रकरणावर उद्या, गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. या सुनावणी दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या बाजूने वकील नीरज कौल यांनी जोरदार युक्तिवाद केला. निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देताना सर्व आवश्यक बाबींची आणि कागदपत्रांची योग्य पडताळणी केली होती, असा युक्तिवाद कौल यांनी न्यायालयात मांडला.
शिंदे गटाचा न्यायालयात युक्तिवाद
शिंदे गटाच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकारांवर आणि प्रक्रियेवर भर दिला. युक्तिवादातील प्रमुख मुद्दे असे –
– निवडणूक आयोग ही एक अत्यंत महत्त्वाची व घटनात्मक संस्था असून तिने घेतलेला निर्णय पडताळणीअंतीच होता.
– पक्षाचे चिन्ह कोणाला द्यायचे याचा निर्णय घेताना विधिमंडळातील लोकप्रतिनिधींची आणि सदस्यांची संख्या महत्त्वाची ठरते.
– ठाकरे यांच्याकडून पक्षाचा वापर वैयक्तिक व्यवस्थेसारखा करण्याचा प्रयत्न केला गेला, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
– पक्षात सत्ता काही ठराविक लोकांच्या हातात केंद्रित झाल्याने मनमानी वाढली होती आणि लोकशाही शिल्लक राहिली नव्हती.
जनतेच्या न्यायालयातही विजय आमचाच; शिंदे गटाचा दावा
या सुनावणीवर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालय, परमेश्वराचे न्यायालय आणि जनता जनार्दनाचे न्यायालय या तिन्ही ठिकाणी शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहील असा ठाम विश्वास व्यक्त केला. कायदेशीर मार्गाने मिळालेले नाव आणि चिन्ह शिंदे गटाकडेच सुरक्षित राहील असा दावा त्यांनी केला.
ठाकरे 2 दिवसांच्या संभाजीनगर दौऱ्यावर
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आजपासून २ दिवसांच्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आहेत. मराठवाडा विकासाच्या विविध प्रश्नांवर आणि सुरू असलेल्या आंदोलनांमध्ये ते सहभागी होणार आहेत. तसेच मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर ते हुतात्म्यांना अभिवादनही करणार आहेत. मराठवाड्याच्या विकासावरून ठाकरे गटाने सध्याच्या राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.