Bhavesh Kavre Tardeo Flat Video: मुंबईतील मराठीबहुल मानल्या जाणाऱ्या ताडदेव परिसरात मांसाहार करणाऱ्यांना घर देण्यास नकार देणारी एक जाहिरात समोर आल्याने नवा वाद पेटला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेला ब्रोकर भावेश कावरे याने एका इन्स्टाग्राम रीलद्वारे ताडदेवमधील एका इमारतीतील 2 BHK फ्लॅटची जाहिरात प्रसिद्ध केली. या व्हिडिओमध्ये त्याने, ‘जर तुम्ही प्युअर शाकाहारी असाल तरच कॉल करा. 900 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असलेले हे घर मांसाहार खाणाऱ्यांना मिळणार नाही,’ असे स्पष्ट विधान केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्यानंतर नागरिक आणि विविध राजकीय संघटनांमधून तीव्र संतापाची लाट उसळली आहे.
ठाकरे गट अन् मनसेचा थेट इशारा; ‘मनसे स्टाईल’ने उत्तर देण्याचे संकेत
मांसाहार विरुद्ध शाकाहार या वादावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अत्यंत आक्रमक झाली आहे. ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी, ‘ब्रोकरही आता बिल्डरांचीच भाषा बोलू लागले आहेत,’ असा थेट आरोप करत संबंधित ब्रोकरचा शोध घेऊन त्याचा योग्य तो समाचार घेतला जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. दुसरीकडे, मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनीही या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवत, मराठी माणसाचा असा अपमान सहन केला जाणार नाही आणि याप्रकरणी ‘मनसे स्टाईल’ने उत्तर दिले जाईल, असे वक्तव्य केले आहे.
संजय राऊत यांची आक्रमक टीका; बिल्डर धोरणांवर उपस्थित केले प्रश्न
या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘केवळ संताप व्यक्त करून चालणार नाही, कारण संताप व्यक्त करणे हे षंढाचे लक्षण असते; आता प्रत्यक्ष कारवाई करावी लागेल,’ असे राऊत म्हणाले. यामागे लोढा किंवा इतर बडे बिल्डर असावेत असा संशय व्यक्त करत त्यांनी मुंबईत मराठी आणि मांसाहारी लोकांना घर नाकारणाऱ्या प्रवृत्तीविरोधात ठाम भूमिकेची गरज प्रतिपादन केली.
मुंबईत आधीही घडल्या आहेत अशा घटना; भावेश कावरे अन् बिल्डरविरोधात रोष
मुंबईतील घाटकोपर, मुलुंड, चांदिवली आणि गिरगाव यांसारख्या भागांत यापूर्वीही मराठी माणसांना किंवा मांसाहार करणाऱ्या कुटुंबांना घरे नाकारल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या होत्या. आता थेट मराठीबहुल ताडदेव परिसरातच अशा प्रकारची भेदभाव करणारी अट लादल्याने मराठी संघटनांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या घटनेमुळे सोशल मीडिया ब्रोकर भावेश कावरे आणि संबंधित इमारतीचा बिल्डर यांच्याविरोधात चौफेर टीका होत असून, मुंबईत पुन्हा एकदा अन्नसंस्कृतीवरून राजकारण तापण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
.. ती वादग्रस्त पोस्ट डिलीट
शाकाहारी-मांसाहारी वादानंतर भावेश कावरे यांनी ती पोस्ट डिलीट केली आहे. मांसाहारींना फ्लॅट न देण्याच्या वादानंतर समाज माध्यमांवर नाराजीच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच, अनेक राजकीय पक्षांनी देखील हरकत घेतली होती. त्यानंतर ही पोस्ट डिलीट केली असल्याची माहिती मिळाली आहे.