मुंबई : एप्रिल महिना सरता सरता राज्यात उष्णतेने मात्र उच्चांक गाठला आहे. महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमानाचा आकडा हा 40 अंश सेल्सियस पार गेला आहे. यातही नागपूरमध्ये सर्वाधिक 45 अंश सेल्सियस इतके तापमान झाले असून छत्रपती संभांजीनगरमध्येदेखील गेल्या वर्षातील रेकॉर्ड मोडून तापमानाने 43 अंश सेल्सियसचा आकडा पार केला आहे. तर एप्रिलमध्येच कडक उन्हामुळे महाराष्ट्र, विशेषतः मुंबई आणि कोकण किनारपट्टीवर उष्ण व दमट वातावरणाने काहिली वाढली आहे. जिथे तापमान36-38C पर्यंत पोहोचले असून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नागरिकांना कडक उन्हापासून बचाव करण्याचा सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. या उष्णतेपासून बचावासाठी भरपूर पाणी, नारळ पाणी पिणे आणि दुपारी घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्यातील थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. लासलगाव येथे गेल्या 13 एप्रिलपासून कमाल तापमान सतत 40 अंश सेल्सिअसच्या वर असून आज तापमानाने 42.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे. या तीव्र उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी होत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. उष्णतेमुळे कोंबड्यांचे अन्न व पाणी घेण्याचे प्रमाण घटले असून त्यामुळे त्यांची वाढ मंदावते आहे. याशिवाय उष्माघातामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत वाढ झाली आहे. तर नाशिक शहरात उष्णतेचा कहर, तापमान 41.4 अंशांवर आला आहे. यंदाच्या हंगामातील उच्चांक, उष्णतेची तीव्र लाट कायम राहिली आहे. दुपारच्या वेळेत रस्ते ओस, नागरिकांनी बाहेर पडणे टाळले. सलग 10-12 दिवसांपासून तापमान 39 अंशांच्या पुढे गेले आहे. तर किमान तापमानही वाढले आहे. रात्रीही उकाडा कायम आहे. तसेच पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात तापमानाने 40 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला असून वाढत्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. या कडक उन्हाचा फटका आता लग्न सोहळ्यांनाही बसताना दिसत आहे. लग्नाला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना उष्माघाताचा धोका निर्माण होत असल्याने आयोजकांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातील गोजेगाव येथे एक वेगळीच कल्पकता पाहायला मिळाली. घुगे आणि सांगळे परिवाराच्या विवाह सोहळ्यात वधूच्या पित्याने पाहुण्यांच्या सोयीसाठी अनोखी शक्कल लढवली. लग्न मंडपाच्या बाजूला स्प्रिंकलर बसवून संपूर्ण परिसरात गारवा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्प्रिंकलरमधून उडणाऱ्या पाण्यामुळे मंडपातील तापमानात लक्षणीय घट झाली आणि वातावरण थंडगार झाले. परिणामी, विवाह सोहळ्यास उपस्थित असलेल्या पाहुण्यांना उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला. या अनोख्या उपाययोजनेमुळे परिसरात या विवाह सोहळ्याची चर्चा रंगली असून, वाढत्या उष्णतेत अशा उपायांची गरज अधोरेखित होत आहे.
तसेच धुळे शहरात तापमानाचा पारा 42 अंशांच्या वर गेल्याने माणसांसह मुक्या प्राण्यांचेही पाण्यासाठी अतोनात हाल होत आहेत. उन्हाळ्याच्या या तीव्र झळांमध्ये रस्त्यावरील गोमातेला पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे आणि त्यांच्यावर गटारीचे किंवा सांडपाणी पिण्याची वेळ येऊ नये, या उद्देशाने श्री द्वारकाधीश प्रतिष्ठानच्या वतीने शहरात ‘गो-हौद’ (पाण्याचे हौद) वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. धुळे शहरात तापमानाचा पारा 42 अंशाच्या पुढे गेल्याने याचा परिणाम पोल्ट्री व्यवसायांवर होऊ लागला आहे. एप्रिल महिन्यातच 42 अंशाच्या पुढे तापमान गेल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणेच तीव्र उष्णतेचा फटका आता पोल्ट्री व्यवसायला बसला आहे. वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी होत असून शेकडो कोंबड्या मृत्युमुखी पडत आहे धुळे तालुक्यातील आर्णी परिसरात पोल्ट्री व्यवसायांवर आता मोठ संकट ओढावला आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये उन्हाचा तडाखा वाढला असून एप्रिलच्या शेवटच्या रविवारी तापमानाने तीन वर्षांचा विक्रम मोडला आहे. एप्रिल महिन्यातील शेवटचा रविवार ‘हॉट संडे’ ठरला. 26 एप्रिल रोजी शहरात कमाल तापमान तब्बल 43.4 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले, जे मागील तीन वर्षांतील सर्वाधिक आहे. तर किमान तापमान 27.6 अंश सेल्सिअसवर कायम राहिले. शहर आणि परिसरात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवू लागला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडलेले दिसून आले, तर नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले. हवामान खात्याने 29 एप्रिल ते 12 मे या कालावधीत तापमान आणखी वाढण्याचा इशारा दिला आहे. सकाळपासूनच तापमानाचा पारा झपाट्याने वाढणार असून दुपारनंतर कडक उन्हाचा तडाखा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. उष्णतेपासून बचावासाठी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नागपुरात रविवारी उष्णतेने कहर केला असून तापमान 45.4 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. तीव्र उन्हामुळे रस्ते ओस पडले असून नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. कळमेश्वर तालुक्यातील मांडवी येथील लक्ष्मण अमृत पाटील (७५) यांचा बसने प्रवास करताना उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली. दरम्यान, चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 33 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना भर दुपारी रणरणत्या उन्हात परीक्षा केंद्रांवर जावे लागले. परीक्षा सकाळच्या सत्रात घ्याव्यात, अशी मागणी शिक्षक समितीने केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने पालकांमध्ये संताप व्यक्त झाला. एका विद्यार्थ्याला प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. चौथीचे 20,238 आणि सातवीचे 13,603 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते.