मुंबई : सत्ताधारी महायुतीतील भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील वाढत्या समन्वयाची प्रचिती पुन्हा आली आहे. मुंबई महापालिकेतील एका गंभीर विषयामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात झालेला संपर्क सध्या चर्चेचा विषय बनला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या समितीत काल, बुधवारी चार महत्त्वाचे प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारासाठी परत आले होते. परंतू त्यातील सेव्हनहिल्स रुग्णालयाचे PPP मॉडेलद्वारे खासगीकरण, 5 उपनगरी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे PPP प्रस्ताव, वांद्रे रेक्लेमेशनमधील Exhibition Centre आणि मालबार हिलमधील ग्रीन झोन बदलाचे प्रस्ताव स्थगित करण्यात आल्याचे समोर आले आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे संबंधीत विषयासाठी ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंपाठोपाठ शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला असल्याचे समजते.
काय म्हणाले मिलिंद नार्वेकर
या विषयी मिलिंद नार्वेकर यांचा एक व्हिडीओ जारी झाला असून त्यामध्ये त्यांनी सांगितले की, ‘आज मुंबई महानगरपालिकेत सुधार समितीमध्ये काही प्रस्ताव मांडले जाणार होते. ते इतके चुकीचे होते, ज्या संबंधी काल आमदार आदित्य ठाकरे यांनी एक पत्रकार परिषद घेतली. त्याचविषयी माझं मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बोलणंही झालं. यावर मुख्यमंत्र्यांनी वाद होऊ नये, तसेच महापालिकेत चुकीच्या गोष्टी होऊ देणार नाही, हे त्यांना पटल्यामुळे त्यांनी सर्व गोष्टी थांबवल्या आहेत. यासाठी त्यांचे धन्यवाद. त्यामुळे सत्ताधारी विरूद्ध विरोधक हा वाद आजतरी महापालिकेत टळलेला आहे, असं मला वाटतं. या प्रस्तावात काही मैदाने, इमारती, बंगले, हॉस्पिटल या संबंधीचे विषय मांडण्यात आले होते. त्यामध्ये आरक्षण बदलणे, इमारतींच्या जागी टॉवर बांधणे असे काही प्रस्ताव होते. परंतू मुख्यमंत्र्यांना याची माहिती मिळताच त्यांनी योग्य ती भूमिका घेतली. त्यामुळे भविष्यात ते सर्वांना एकत्र घेऊन नीट आणि स्वच्छ कारभार करणार आहे, अशी खात्री मला वाटत आहे,’ असेही नार्वेकर यांनी नमूद केले.
आमदार आदित्य ठाकरे आणि भाजपमधील संघर्ष नवा नाही. मुंबई महानगरपालिका स्तरावरही याच पद्धतीने संघर्ष होताना दिसत आहे. परंतू आदित्य ठाकरे यांच्याप्रमाणेच मिलिंद नार्वेकर यांनीसुद्धा भूमिका लावून धरल्याने सेव्हन हिल्स रुग्णालयाचं खासगीकरण रद्द झालं आहे, असे समजते. त्यामुळे 5 उपनगरी रुग्णालयांतील रक्तपेढ्यांचे PPP प्रस्तावही बारगळलेले आहेत. आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेत तसेच ही भूमिका प्रत्यक्षात सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मागच्या दरवाज्याने मिलिंद नार्वेकर यांनी सक्रिय भूमिका निभावली, असं दिसून येत आहे. सुधार समितीमध्ये हे प्रस्ताव आले होते. त्यानुसार प्रस्तावाच्या माध्यमातून महत्त्वाच्या सेवांचं खासगीकरण होईल, ही भीती ठाकरे गटाने मांडली होती.
दरम्यान, यासर्व प्रस्तावांवर आदित्य ठाकरे आणि ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला होता. काही प्रस्तावांवर चर्चेविनाच ब्रेक लावण्यात आला असून अध्यक्षांकडून प्रस्ताव प्रशासनाकडे पुन्हा फेरविचारासाठी पाठवण्यात आला. यावेळी रक्तपेढी प्रस्तावावर तर स्वतः शिंदे गटाच्या नगरसेवकाकडूनही फेरविचाराची सूचना करत आदित्य ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यात आला. आदित्य ठाकरेंच्या आक्षेपांनंतर शिवसेना नेते (ठाकरे गट) मिलिंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना या प्रस्तावांमधील मध्यरात्री फोन करून त्रुटींची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर फडणवीसांनी मध्यरात्रीच भाजप नगरसेवकांकडून अहवाल मागवला आणि प्रस्ताव मंजूर न करण्याच्या सूचना दिल्या. या सर्व घडामोडींमुळे मातोश्री आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये वाढलेला समन्वय, हा शिंदेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.