ठाणे: राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. अशातच ठाण्यातील कळवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या 21 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तरुणाला 22 मे रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. चाचणीत त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. आज (24मे) सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्याने अखेरचा श्वास घेतला.
संबंधित तरुण मुंब्र्यातील रहिवासी होता. काही दिवसांपासून त्याला ताप, थकवा, श्वास घेण्यास त्रास आणि अंगदुखी जाणवत होती. तब्येत अधिक खालावल्याने कुटुंबीयांनी तातडीने त्याला ठाण्यातील कळवा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात दाखल होताच त्याच्यावर विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या आणि त्यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याची प्रकृती आणखी बिघडली. फुफ्फुसांवर संसर्गाचा तीव्र परिणाम झाल्याने त्याला श्वास घेण्यास मोठा त्रास होऊ लागला होता. अखेर डॉक्टरांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आणि सकाळी त्याचा मृत्यू झाला.
हेही वाचा:मुंबईत कोरोनाचा धोका वाढतोय का? सध्या 53 सक्रिय रुग्ण
या घटनेनंतर कुटुंबीयांमध्ये शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एवढ्या कमी वयातील तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची ही दुर्दैवी घटना ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे.
कळवा रुग्णालय प्रशासनाने या मृत्यूची माहिती तातडीने आरोग्य विभागाला दिली असून, संबंधित कुटुंबीय व संपर्कात आलेल्या व्यक्तींची तपासणी करण्यात येत आहे. कोविड प्रोटोकॉलचे पालन करत तरुणाच्या पार्थिवाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, ठाण्यासह राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. नागरिकांनी मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर आणि सामाजिक अंतराचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
विशेषतः सार्वजनिक ठिकाणी जाण्यापूर्वी किंवा लक्षणं जाणवल्यास चाचणी करून घेणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. कमी वयात देखील कोरोना जीवघेणा ठरू शकतो, हे या घटनेने दाखवून दिले आहे.