Wednesday, May 14, 2025 11:48:26 PM

ठाणे जिल्ह्यात 16 शाळा अनधिकृत; शिक्षण विभागाचा पालकांना सजगतेचा इशारा

ठाणे जिल्ह्यात 16 अनधिकृत शाळा उघडकीस; शासकीय मान्यता नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात. पालकांना शाळेची मान्यता तपासण्याचे जिल्हा परिषदेचे आवाहन.

ठाणे जिल्ह्यात 16 शाळा अनधिकृत शिक्षण विभागाचा पालकांना सजगतेचा इशारा

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभागाच्या तपासणीत 16 शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता अनधिकृतरीत्या चालविल्या जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. या शाळांनी कोणतीही शासकीय परवानगी न घेता शिक्षण संस्था चालविणे सुरू ठेवले असून, त्यामुळे या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्यातील शैक्षणिक नुकसान होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदीप जिजाबाई लालजी पाटील यांनी पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्याचा शाळेमध्ये प्रवेश घेताना संबंधित शाळेची शासकीय मान्यता व नोंदणी क्रमांक काळजीपूर्वक तपासावा. अन्यथा, विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र, पुढील शिक्षण आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा:शिर्डी साईबाबा संस्थानाला बॉम्बने उडविण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

शिक्षण विभागाने या 16 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांची नावे पुढीलप्रमाणे:

1. आर.एन. इंग्लिश स्कूल, कोनगाव, भिवंडी

2. इंग्लिश प्रायमरी माध्यमिक उच्च माध्यमिक स्कूल, टेमघर, भिवंडी

3. फकिह इंग्लिश स्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज, गौरीपाडा, भिवंडी

4. एस.एस. इंडिया हायस्कूल, दिवा (पूर्व)

5. श्री. विद्या ज्योती स्कूल, डावले, ठाणे

6. केम्ब्रीज इंग्लिश स्कूल, मुंब्रा

7. एस.एस. इंग्लिश हायस्कूल, दिवा (पूर्व)

8. ओमसाई इंग्लिश स्कूल, दिवा

9. पी.टी.आर.एस.डी. इंग्लिश स्कूल, टिटवाळा

10. चेतना हिंदी विद्यामंदिर, कल्याण (पूर्व)

11. ओम साई इंग्लिश स्कूल, पिसवली

12. रेनबो इंटरनॅशनल स्कूल, ठाणे (पश्चिम)

13. शारदा इंग्रजी माध्यमिक शाळा

14. डी.आर. पाटील इंग्लिश मेडियम स्कूल, तुर्भे, नवी मुंबई

15. अल मुनीहाज सेकंडरी हायस्कूल, बेलापूर, नवी मुंबई

16. ओईएस इंटरनॅशनल स्कूल, वाशी, नवी मुंबई

या शाळांकडे माध्यमिक शिक्षणासाठी आवश्यक शासकीय मान्यता उपलब्ध नाही. त्यामुळे या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अनुचित असून, भविष्यातील शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी पालकांनी सजग राहणे आवश्यक आहे.

शिक्षण हा मुलभूत हक्क असताना काही शाळांनी केवळ व्यवसायिक हेतूने विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात घालणे ही गंभीर बाब आहे. अशा शाळांविरुद्ध लवकरच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असून, पालकांनी कोणत्याही प्रवेशापूर्वी अधिकृत शाळांची माहिती तपासून निर्णय घ्यावा, असे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.
 


सम्बन्धित सामग्री