ठाणे स्थानकावर सकाळच्या वेळेस मोठी खळबळ उडाली. ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याची बातमी समोर आली आहे. यामुळे सकाळी 9.14 ते 9.26 या वेळेत लोकल 12 मिनिटे उशिराने धावत असल्यामुळे प्रवासी खोळंबले होते. साप दिसल्याची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या.
दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वरून लोकल सुटल्यानंतर ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिसल्याची माहिती समोर आली. त्यानंतर अलार्म चेन पुलिंग केल्याने लोकल तातडीने थांबवली आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी महिलांच्या डब्याची तातडीने तपासणी केली. तपासणीनंतर परिस्थिती सुरक्षित असल्याची खात्री करून लोकल पुढे रवाना करण्यात आली.
या घटनेमुळे काही काळ प्रवाशांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. सकाळी 6 वाजल्यापासूनच लोकांचा ऑफिस टाईम आणि कॉलेज टाईम सुरु होतो. तर 8 ते 11 या वेळेत रेल्वेस्थानकावर प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. अशातच ठाणे स्थानकावर महिलांच्या डब्यात साप दिल्याची घटना समोर आल्याने रेल्वेस्थानकावर एकच खळबळ उडाली.
या प्रकाराचा काही लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर किरकोळ परिणाम झाला. दरम्यान साप नेमका कुठून आला आणि तो लोकलच्या डब्यात कसा शिरला, याबाबत माहिती घेतली जात आहे. तसेच नक्की साप प्रत्यक्षात आढळला का? याबाबत रेल्वेकडून अधिकृत माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, रेल्वे प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आल्यानंतर लोकल सेवा पुन्हा सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे काही काळ प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.