Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर आता राजकीय वर्तुळात आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर भाष्य करताना गंभीर प्रश्न उपस्थित केले असून, तपासावर आणि डीजीसीएच्या (DGCA) भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे.
तपासातील 'ती' वेळ आणि विसंगती
रोहित पवार यांनी आरोप केला की, ज्या दिवशी (28 जानेवारी) अजित पवारांचे पार्थिव रुग्णालयात होते, त्याच दिवशी दुपारी 1 वाजून 36 मिनिटांनी डीजीसीएने घाईघाईत पहिला अहवाल सादर केला. या प्राथमिक अहवालात विमान कंपनीला (VSR) झुकतं माप देऊन 'क्लीन चिट' देण्याचा प्रयत्न झाला, असा दावा रोहित पवारांनी केला आहे. सुरुवातीला कोणतीही अडचण नसल्याचे सांगणाऱ्या यंत्रणांनी आताच्या ताज्या अहवालात मात्र सुरक्षेच्या त्रुटी मान्य केल्या आहेत.
"हा घातपात की अपघात?"
रोहित पवार म्हणाले की, हा केवळ एका कुटुंबाचा विषय नसून संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. आजही जनतेच्या मनात या घटनेबद्दल संशय आहे. "लोकांच्या मनात आजही प्रश्न आहेत. हे नक्की काय घडलं? हा अपघात होता की घातपात? कुणी कट रचला होता का? चहाच्या टपरीपासून सोशल मीडियापर्यंत दादांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे," असंही रोहित पवार यांनी यावेळी नमूद केलं.
विमान कंपनीला वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न?
राज्य सरकार आणि संबंधित मंत्र्यांवर टीका करताना रोहित पवार म्हणाले की, सरकार केवळ कारवाईचा दिखावा करत आहे. प्रत्यक्षात विमान कंपनीला त्यांच्या त्रुटी दुरुस्त करून पुन्हा विमान उडवण्याची अप्रत्यक्ष परवानगी दिली जात आहे. नेत्याचा जीव गेला असतानाही कंपनीला वाचवण्याचे प्रयत्न होणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा - Rohit Pawar : "पुढील 48 तासात सर्वकाही उघड करणार" दादांच्या विमान अपघातानंतर रोहित पवारांची आक्रमक भूमिका
मोठ्या गौप्यस्फोटाची तयारी
रोहित पवारांनी या संपूर्ण प्रकरणात नवीन पुरावे हाती लागल्याचे संकेत दिले आहेत. "येत्या दोन दिवसांत मी सविस्तर पत्रकार परिषद घेऊन डीजीसीएच्या अहवालाचा खरा चेहरा समोर आणणार आहे," असे सांगत त्यांनी मोठ्या गौप्यस्फोटाचे संकेत दिले आहेत. यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता रोहित पवारांच्या आगामी पत्रकार परिषदेकडे लागले आहे.