Massajog Election: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे लोकनियुक्त सरपंच संतोष देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदासाठी आता पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज, 7 एप्रिल 2026 पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे. संतोष अण्णांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध करून त्यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांना संधी द्यावी, अशी भावनिक साद त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी घातली आहे.
18 महिन्यांचा कार्यकाळ आणि अण्णांचे स्वप्न
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती, ज्यामुळे गावात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर आता सरपंच पदाचा उर्वरित 18 महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक आहे. धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “अण्णांनी गावाच्या विकासासाठी आणि सामाजिक कामासाठी जे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. यासाठी गावकऱ्यांनी आणि इतर इच्छुकांनी ही निवडणूक बिनविरोध करून सहकार्य करावे.”
गावकरी आणि पॅनेल प्रमुखांचा सकारात्मक प्रतिसाद
2022 च्या निवडणुकीतील गटप्रमुख, पॅनेल प्रमुख आणि विद्यमान सदस्यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. संतोष अण्णांच्या कार्याचा सन्मान राखण्यासाठी अनेकांनी अश्विनी देशमुख यांना बिनशर्त पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे. कायदेशीर लढाई आणि सामाजिक जबाबदारी या दोन्ही आघाड्यांवर कुटुंबाला त्रास होऊ नये, यासाठी गावाने एकोप्याने निर्णय घ्यावा, अशी विनंती कुटुंबाकडून करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील 88 जागांसाठी रणधुमाळी
प्रशासनाने बीड जिल्ह्यातील एकूण 88 रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रिया जाहीर केली आहे. यामध्ये 16 सरपंच आणि 72 सदस्य पदांचा समावेश आहे. मस्साजोगसाठी 7 एप्रिल ते 13 एप्रिल या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी राजकीय हालचालींना वेग आला असून, येत्या दोन दिवसांत गावकरी एकत्र येऊन ही निवडणूक बिनविरोध करण्यावर शिक्कामोर्तब करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.