Abhay Mokashi Passed Away: आपल्या लेखणीने सत्ताधाऱ्यांना धडकी भरवणारे आणि सडेतोड पत्रकारितेचा आदर्श वस्तुपाठ घालून देणारे ज्येष्ठ पत्रकार अभय मोकाशी यांचे शनिवारी (2 मे) रात्री निधन झाले. विशेष म्हणजे, आज 3 मे रोजी त्यांचा 70 वा वाढदिवस होता, परंतु वाढदिवसाच्या काही तास आधीच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही महिन्यांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रातील एक 'चालते-बोलते विद्यापीठ' हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.
ज्यांच्या एका बातमीने मुख्यमंत्र्यांचा राजीनामा घेतला…
अभय मोकाशी यांची ओळख केवळ पत्रकार म्हणून नव्हती, तर सत्तेला प्रश्न विचारणारा एक बुलंद आवाज म्हणून होती. तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर-पाटील यांच्या मुलीच्या वैद्यकीय परीक्षेतील गुण फेरफार प्रकरणाचा पर्दाफाश मोकाशी यांनीच केला होता. या बातमीने राज्याच्या राजकारणात असा काही भूकंप झाला की, निलंगेकरांना मुख्यमंत्रीपदाचा त्याग करावा लागला. इतकेच नव्हे, तर त्यांच्या शोधपत्रकारितेमुळे एका राज्यपालांनाही आपले पद सोडावे लागले होते.
किडनी रॅकेटचा पर्दाफाश आणि धाडसी शोधपत्रकारिता
90 च्या दशकात 'मिड डे'मध्ये कार्यरत असताना त्यांनी मानवी अवयवांच्या तस्करीचे (किडनी रॅकेट) मोठे रॅकेट उघडकीस आणले होते. त्यांच्या या बातमीमुळे संपूर्ण देश हादरला होता. 'इंडियन एक्स्प्रेस', 'मिड-डे' आणि 'फ्री प्रेस जर्नल' अशा नामांकित वृत्तपत्रांत त्यांनी राजकीय संपादक म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी सांभाळली. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शिवसेनेचा झालेला विस्तार त्यांनी अत्यंत जवळून अनुभवला आणि टिपला होता.
नवोदित पत्रकारांचे मार्गदर्शक
केवळ बातमीदारी न करता त्यांनी पत्रकारितेचे संस्कार पुढच्या पिढीवर घडवले. 'आमरस' (AAMRAS) या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना पत्रकारितेचे बारकावे शिकवले. त्यांची शिकवण्याची शैली आणि विषयाची मांडणी अत्यंत अभ्यासू असायची. वर्षभरापूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. बोरिवली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने माध्यम वर्तुळाने एक सच्चा मित्र, मार्गदर्शक आणि तत्त्वनिष्ठ संपादक गमावला आहे.