नागपूर : नागपुरातील पाचपावली परिसरातील ‘हिरा स्वीट’ या प्रतिष्ठानच्या उत्पादन युनिटमध्ये मृत उंदीर आढळल्याने मोठी खळबळ माजली आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ने या प्रतिष्ठानावर मोठी कारवाई करत त्याचा अन्न व्यवसाय परवाना रद्द केला आहे. या घटनेमुळे शहरातील खाद्य व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 3 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाने हिरा स्वीटच्या उत्पादन केंद्राची तपासणी केली असता सोनपापडीच्या उत्पादन प्रक्रियेतवेळी विभागात मृत उंदीर आढळून आला. ही बाब सार्वजनिक आरोग्यासाठी गंभीर धोकादायक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर प्रशासनाने संबंधित प्रतिष्ठानाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
यानंतर 6 जुलै रोजी अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, 2006अंतर्गत हिरा स्वीटचा अन्न व्यवसाय परवाना रद्द करण्याचे आदेश दिले. ही कारवाई संयुक्त आयुक्त (अन्न) के. आर. जयपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. ए. एन. खंडारे यांनी केली. एफडीएच्या या कठोर कारवाईमुळे नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा स्पष्ट संदेश प्रशासनाने दिला आहे.