पुढील काही तासात पावसाचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून सर्वदूर पाऊस कोसळताना दिसणार आहे. हवामान विभागाकडून मराठवाडा, विदर्भ आणि कोकण घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुणेकरांसाठी पुढील दोन दिवसांचा अत्यंत महत्त्वाचा इशारा जारी केला.
पुढील दोन दिवस पुणे शहरात आकाश मुख्यतः ढगाळ राहील आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळतील. यावेळी घाटमाथ्यावर जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याचसोबत पुणे घाटमाथा, सातारा, रायगड, जळगाव, कोल्हापूर, वर्धा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोदिंया, चंद्रपूर, गडचिरोली, धुळे, नशिक, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, धुळे, बीड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला. त्यामुळे राज्यातील जवळपास जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला.
नागपूरमध्ये मंगळवारी झालेल्या अतिमुसळधार पावसानंतर बुधवारीही जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. त्यानंतर ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली होती. काल दिवसभर ढगाळ वातावरण असूनही पावसाने हजेरी लावली नाही. सायंकाळी केवळ 0.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी 180 मि.मी., तर बुधवारी एकूण 186 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. यावेळी नागपुरात तापमान 2.5 अंशांनी घसरले असून हवेत आर्द्रता 90 टक्क्यांवरून 80 टक्क्यांवर आली आहे. हवामान विभागाने नागपुरकरांसाठी पुढील 24 तासांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे.
तर नाशिक जिल्ह्याच्या दक्षिण भागात 31 जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. यावेळी धोकादायक इमारतींतील नागरिकांचे तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. दरडप्रवण भागांवर सतत देखरेख ठेवून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याच्या सूचना देत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन आहे.
तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये चाललेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 99 टक्के भरले असून जिल्ह्यातील चित्री ,जगम हट्टी प्रकल्प हे शंभर टक्के भरले आहे. जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक बंधारे पाण्याखाली गेली असून पंचगंगा नदीची पातळी 32 फुटावर आहे.
गोंदिया जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे पुजारीटोला धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत. या धरणातून सध्या नदीपात्रात 10832 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना 'अलर्ट' जारी केला आहे. पुजारीटोला धरणाचा पाणीसाठा सध्या 86 टक्के झाला आहे. त्यामुळे पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून पाण्याच्या विसर्ग सुरू असल्याने नदी काठावरील गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याच्या इशारा गोंदिया जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आले आहे. या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असल्याने गोसीखुर्द धरणाचे संपूर्ण 33 गेट 0.5 मीटरने उघडण्यात आली आहेत. या धरणातून 3841.98 क्युमेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर नदी काठावरील गावांना जिल्हा प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.