Wednesday, April 22, 2026 11:35:48 PM

Nashik Tragedy: पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा; दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दिंडोरीतील 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

दिंडोरीतील भीषण कार अपघाताची जखम ताजी असतानाच, आता पोहण्याच्या नादात 4 चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.

nashik tragedy पोहण्याचा मोह ठरला जीवघेणा दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दिंडोरीतील 4 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

Nashik Tragedy: नाशिक जिल्ह्याला लागलेले अपघातांचे ग्रहण सुटता सुटेनासे झाले आहे. दिंडोरीतील भीषण कार अपघाताची जखम ताजी असतानाच, आता पोहण्याच्या नादात 4 चिमुकल्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कादवा नदी आणि ओढ्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने या दोन दुर्दैवी घटना घडल्या असून, यामुळे संपूर्ण जिल्हा हळहळत आहे.

पहिली घटना: कादवा नदी दोन मित्रांचा करुण अंत
दिंडोरी तालुक्यातील वरखेडा येथील जनता विद्यालयाचे 3 विद्यार्थी मंगळवारी सायंकाळी परमोरी परिसरात कादवा नदीवर पोहण्यासाठी गेले होते. मात्र, पाण्याचा खोलीचा अंदाज न आल्याने समीर रावसाहेब गांगोडे (14) आणि यश राहुल पगारे (12) हे दोघे खोल पाण्यात बुडाले. सुदैवाने, त्यांचा तिसरा मित्र या संकटातून सुखरूप बचावला आहे. याप्रकरणी वणी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

दुसरी घटना: ओढ्यात आंघोळ करताना काळाचा घाला
दुसरी दुर्दैवी घटना निफाड तालुक्यातील खेरवाडी येथे घडली. एका कार्यक्रमासाठी नातेवाईकांकडे गेलेले मोहाडी (ता. दिंडोरी) येथील रुद्र गणेश जाधव (13) आणि ओमकार सुनील फटांगडे (13) हे दोन विद्यार्थी दुपारी ओढ्यात आंघोळीसाठी उतरले होते. खेळता खेळता पाण्याचा अंदाज चुकला आणि या दोघांचाही बुडून करुण अंत झाला. हे दोघेही मोहाडी येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी होते. सायखेडा पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली आहे.

हेही वाचा - Bhimashankar Temple: शिवभक्तांच्या सुरक्षिततेसाठी मोठा निर्णय; श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 'या' तारखेपर्यंत दर्शनासाठी बंद; कुंभमेळ्याच्या तयारीला वेग

तीन दिवसांपूर्वीच झाला होता भीषण अपघात
विशेष म्हणजे, केवळ 3 दिवसांपूर्वीच दिंडोरीतील कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 6 विद्यार्थ्यांसह 9 जणांचा बळी गेला होता. या धक्क्यातून सावरत असतानाच पुन्हा 4 शालेय मुलांच्या मृत्यूने दिंडोरी आणि निफाड तालुक्यात स्मशानशांतता पसरली आहे.
 


सम्बन्धित सामग्री