भारतीय हवामान खात्याने दिलेल्या एल निनोच्या इशाऱ्यानुसार जून महिना कोरडा गेला असला, तरी जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मागील 3 दिवसांच्या या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमधील मोठा बॅकलॉग भरून काढला आहे. दरम्यान आयएमडी आणि युरोपियन हवामान मॉडेल्सनुसार जुलैच्या उत्तरार्धात पावसाचा जोर कमी होण्याचे संकेत आहेत. यावेळी कोकणात काही भागांत आज रेड अलर्ट तर मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर राज्यातील इतरही भागात पाऊस सुरू आहे. बीड, हिंगोली, जालना, परभणी, लातूर, नांदेड या जिल्ह्यांमध्येही विजांच्या कडकाडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे.
मुंबईत काय स्थिती?
मुंबईच्या पश्चिम उपनगरात सुरू असलेला जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. अंधेरी सबवे मध्ये दोन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून बॅरिकेट लावून अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहतूक पोलिसांकडून अंधेरी गोखले पुलाचा वापर करा असा वाहन चालकांना आवाहन केला जात आहे.
हेही वाचा- Mumbai Local Train News: रेल्वे पोलिसांचा मोठा निर्णय! लोकल प्रवासात आता 'या' वस्तूंना बंदी, होणार तपासणी
कोकणात अलर्ट जारी
तर कोकण किनारपट्टीवर वेगाने वारे वाहत असून समुद्रात मोठ्या लाटा उसळत आहेत. याचपार्श्वभूमिवर मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आव्हान प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तावला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर धरल्याचे पाहायला मिळाले आहे. जिल्ह्यात दोन दिवसात 646 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली असून जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तर अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना देखील घडत आहेत.
तर रायगडला आज आणि उद्या असे दोन दिवस पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. रात्री पासूनच जोरदार पावसाने रायगडकरांना चांगलेच झोडपुन काढले आहे. पावसाचा जोर असला तरी कोणतीही धोकादायक परिस्थिती नसल्याने शाळा, महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आलेली नाही. आंबा नदी वगळता जिल्ह्यातील इतर नद्या सामान्य पातळीवर वाहत आहेत.
विदर्भ-मराठवाड्यात संततधार
हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार गोंदिया जिल्ह्यात मागील 2 दिवसांत आतापर्यंत सुमारे 106 मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच अपेक्षित पावसाच्या जवळपास 48.5% पाऊस पडला असल्याची माहिती गोंदियाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांनी दिली आहे. या पावसामुळे गोंदिया जिल्ह्यात सध्या थंडगार वातावरण झाले असून नागरिकांसह शेतकऱ्यांनी सुद्धा या पावसाच्या आगमनामुळे आनंद व्यक्त केला आहे. गोंदिया जिल्ह्याच्या धरण साठ्यामध्ये वाढ होत असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जिल्ह्यातील नागरिकांचा आता मिटला असल्याचे चित्र पाहावयास मिळतात.
भंडारा जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही रिमझिम पावसाची हजेरी लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांसह शेतकऱ्यांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण असून अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे खरीप हंगामातील शेतीकामांना वेग मिळण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात काय स्थिती?
पुण्यात पावसाची दमदार हजेरी लावली असून गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. शहरातील मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्येही जोरदार पावसाची नोंद करण्यात आली आहे. यावेळी घाटमाथा आणि धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढत आहे. पावसामुळे काही सखल भागांमध्ये पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या असून वाहतुकीवरही परिणाम होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील सात दिवस पुणे आणि परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. 4 आणि 5 जुलै रोजी पुणे शहर आणि घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, तसेच नदी-नाले आणि धबधब्यांच्या परिसरात जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
5 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम
यावेळी मान्सून सक्रिय असल्याने मुंबईसह राज्यभर मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तावली आहे. 5 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज असून काही जिल्ह्यांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे.
3 जुलै: संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट; रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसराला रेड अलर्ट.
बुलढाणा, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी.
4 जुलै: ठाणे, रायगड, पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथा परिसराला रेड अलर्ट; उर्वरित कोकणाला ऑरेंज अलर्ट.
5 जुलै: पुणे जिल्ह्यातील घाटमाथा परिसराला रेड अलर्ट; संपूर्ण कोकणाला ऑरेंज अलर्ट.
3 ते 9 जुलै: देशभर, विशेषतः मध्य भारत आणि महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता.
9 ते 16 जुलै: देशभर पावसाचे प्रमाण समाधानकारक राहण्याचा अंदाज.
16 ते 22 जुलै आणि 23 जुलै ते 3 ऑगस्ट: पावसात मोठी घट होण्याची शक्यता.