Maharashtra Weather Forecast: राज्यात मान्सून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सक्रिय झाला असून हवामान विभागाने पुढील 5 दिवसांचा सविस्तर अंदाज जाहीर केला आहे. आज, 8 जुलै रोजी पालघर, रायगड तसेच नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाट क्षेत्रासाठी प्रशासनाने 'रेड अलर्ट' जारी केला आहे. या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज 'यलो अलर्ट' लागू करण्यात आला आहे.
9 ते 11 जुलै दरम्यानचा अंदाज; विदर्भात पावसाचा जोर वाढणार
उद्या, 9 जुलै रोजी पुणे आणि सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट कायम राहणार आहे, तर मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिकसह एकूण 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर, 10 आणि 11 जुलै रोजी राज्यातील रेड आणि ऑरेंज अलर्टची तीव्रता कमी होणार असली, तरी विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असेल. या दोन दिवसांत विदर्भात विजांच्या कडकडाटासह जोरदार सरी कोसळतील. पुढे 12 जुलै रोजी पूर्व विदर्भासह अमरावती, यवतमाळ आणि वाशीम जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर
सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे नाशिकमधील गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे, तर पुणे आणि रायगड भागातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या जलस्तरातही वेगाने वाढ होत आहे. मुंबईत झालेल्या काही वेळच्या पावसानेच पुन्हा एकदा प्रशासकीय दाव्यांची पोलखोल केली आहे.
दरम्यान, किंग्ज सर्कल सारख्या सखल भागातील रस्ते जलमय झाल्याने पाणी उपसण्यासाठी बीएमसीला (BMC) मोठ्या पंपांचा वापर करावा लागला. शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडल्याने आणि पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून मुंबईकरांना कोंडीचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, घाट रस्त्यांवरील प्रवास टाळण्याचे आणि मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचे आवाहन केले आहे.