Pune Election Results: पुणे महानगरपालिका निवडणुकीत किंगमेकर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला पुणेकरांनी मोठा धक्का दिला आहे. भाजपसोबत युती न करता तब्बल 119 जागांवर 'स्वबळा'वर लढण्याचा निर्णय शिवसेनेच्या पूर्णपणे अंगाशी आला आहे. या निवडणुकीत शिंदेंच्या एकाही उमेदवाराला विजयाचा गुलाल उधळता आला नाही, ज्यामुळे पक्षाच्या रणनीतीवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जागावाटपाचा अट्टाहास आणि चुकीची रणनीती
महायुतीमध्ये जागावाटपावरून बिनसल्याने शिवसेनेने वेगळी चूल मांडली होती. भाजपने 165 पैकी 16 जागांची ऑफर दिली होती, मात्र शिवसेनेला 25 जागा हव्या होत्या. हा तिढा न सुटल्याने अखेरीस शिवसेनेने 119 उमेदवार रिंगणात उतरवले. मात्र, निकालांनी हे सिद्ध केले की भाजपने दिलेली ऑफर धुडकावून स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेसाठी राजकीयदृष्ट्या 'घातकी' ठरला.
हेही वाचा - Maharashtra Election Result 2026: राज्यात 'कमळ' जोमाने फुलले; भाजप नंबर एक, तर शिंदेंची शिवसेना दुसऱ्या स्थानी; वाचा संपूर्ण यादी एका क्लिकवर
आश्वासनांचा पाऊस निष्फळ; दिग्गजांची पडझड
निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदे यांनी पुण्यात सभा घेऊन 'लाडकी बहीण' योजना आणि भ्रष्टाचारमुक्त पुण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, मतदारांनी या आश्वासनांना फारसा प्रतिसाद दिला नाही. या पराभवात अनेक दिग्गजांना आपली जागा गमवावी लागली. शहरप्रमुख नाना भानगिरे स्वतःचा पराभव टाळू शकले नाहीत. तसेच रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा आणि चिरंजीव प्रणव धंगेकर यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
हेही वाचा - BMC Election 2026 : मुंबईचा महापौर ठरण्याआधी शिंदेंचे शिलेदार 'ताज'मध्ये कडेकोट बंदोबस्तात! फोडाफोडीचं सावट की गेम प्लॅन?
पराभवाची कारणे आणि आगामी 'खांदेपालट'
शिवसेनेच्या या मानहानीकारक पराभवामागे अंतर्गत गटबाजी आणि नियोजनाचा अभाव ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. तिकीट वाटपावरून झालेली धुसफूस आणि प्रचारातील समन्वयाचा अभाव यामुळे कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. पुण्याच्या राजकारणात केवळ आर्थिक योजना किंवा आश्वासने चालत नाहीत, तर मजबूत संघटन आवश्यक असते, हे या निकालाने स्पष्ट केले आहे. या पराभवानंतर आता एकनाथ शिंदे पुण्यातील पक्ष संघटनेत मोठे फेरबदल करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.